दिवाळीचा किंवा सणांचा मोसम आला की वाहन विक्रेत्यांच्या ओठावर आपसूकच हसू उमटते. ग्राहकांकडून गाडय़ांना हमखास मागणी वाढणार असा आत्मविश्वास त्यात दडलेला असतो. मात्र यंदाची दिवाळी वाहन विक्री करणाऱ्यांसाठी फारशी आनंददायक ठरली नाही. मारुती सुझुकी, ह्य़ुंडाई आणि महिंद्र या प्रमुख वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या विक्रीत दिवाळीत अपेक्षित वाढ झाली नाही.
आश्चर्यकारक बाब म्हणजे वाहन निर्मिती करणाऱ्या अन्य काही कंपन्यांमध्ये तर ऑक्टोबर २०१४ मध्ये चक्क घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. होंडा कार्य इंडिया या कंपनीने मात्र ऑक्टोबर २०१४ मधील विक्रीत तब्बल १८.८ टक्क्यांची वाढ दाखवली आहे.
दसरा, दिवाळी आणि विधानसभेची निवडणूक यंदा ऑक्टोबर या एकाच महिन्यात आली. त्यामुळे वाहन विक्री करणाऱ्या उद्योगांची भरभराट होणार असा कयास होता. मात्र मारुती सुझुकी इंडिया, ह्य़ुंडाई या कंपन्यांच्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या वाहनविक्रीत अत्यल्प वाढ झाल्याचे दिसून आले. तर महिंद्र अँड महिंद्र, टोयोटा किलरेस्कर आणि फोर्ड या वाहन निर्मितीतील अग्रगण्य कंपन्यांना या महिन्यात झालेल्या वाहन विक्रीत चक्क घट होताना पाहावे लागले.गतवर्षी दिवाळी असलेल्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत मारुती सुझुकीच्या ९७०६९ गाडय़ा यंदा विकल्या गेल्या. ही वाढ १ टक्का होती. मात्र ऑक्टोबर महिन्यात कामाचे अवघे १९ दिवसच होते. त्याचा हा फटका असावा असा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे. त्याच महिन्यात ह्य़ुंडाई मोटर्स इंडियाने गतवर्षीच्या तुलनेत साडे पाच टक्क्यांची वाढ दर्शवताना ३८०१० वाहनांची विक्री केली. एलिट आय २० आणि एक्सेंट या गाडय़ांना बाजारपेठेतून मागणी वाढत असल्याचे यंदा दिसले, तरीही अपेक्षित वाढीचा आकडा गाठता आलेला नाही, असे निरीक्षकांचे मत आहे.
महिंद्रला फटका
 या मोसमातील मंदीचा मोठा फटका महिंद्र अँड महिंद्रला बसला. गतवर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत यंदा त्यांना १५.७१ टक्क्यांची घट सोसावी लागली. गतवर्षी महिंद्र अँड महिंद्रच्या ४७७८७ गाडय़ांची विक्री झाली होती. यंदा हाच आकडा ४०२७४ पर्यंत घसरला. बाजारपेठेतील एकूण खरेदीविरोधी वातावरण आणि वाहन कर्जाचे वाढीव दर हे याचे कारण असावे, असे महिंद्र अँड महिंद्रच्या ऑटोमोटिव्ह सेलचे मुख्याधिकारी प्रवीण शाह यांनी सांगितले.
होंडाची ‘भरारी’ कायम
सर्वच वाहन कंपन्या ग्राहकांच्या ‘दुर्लक्षा’चा सामना करीत असताना होंडाने मात्र आपली गगनभरारी कायम ठेवली. गतवर्षीच्या तुलनेत त्यांनी १८.०८ टक्क्यांची वाढ दर्शवली. ऑक्टोबरमध्ये १३,२४२ गाडय़ांची विक्री झाली. अर्थव्यवस्था जरी पुनरुज्जीवनाच्या वाटेवर असली तरीही ग्राहकांना वाहनखरेदीकडे वळायला अजूनही वेळ लागेल. महागाई आणि वाढीव कर्जदर यामुळे विक्रीला प्रतिसाद नसावा, असे मत फोर्डच्या मार्केटिंग विभागाने व्यक्त केले.