व्हिडिओकॉन समूहाला मंजूर केलेल्या कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांना सेबीकडून मोठा आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो. सध्या सेबीकडून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. सेबी ही शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था आहे. सेबीच्या नियमानुसार चंदा कोचर यांना जास्तीत जास्त २५ कोटी रुपये दंड ठोठावला जाऊ शकतो. पण कितपत दंड ठोठावायचा ते अधिकाऱ्यांवर अवलंबून आहे असे या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले.
सेबी जास्तीत दंड ठोठावू शकते पण त्यांच्याकडून आयसीआयसी बँकेतील पदांचा राजीनामा मागू शकत नाही असे एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूह आणि नू-पॉवर कंपनीसोबत केलेल्या व्यवहाराबाबत सेबीने २४ मे रोजी आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांना नोटीस बजावली.
नू-पॉवर कंपनीमध्ये दीपक कोचर यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप होत आहे. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉन समूहाचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी नू-पॉवर कंपनीमध्ये ६४ कोटी रुपये गुंतवल्याचे बोलले जाते.दीपक कोचर चंदा कोचर यांचे पती आहेत. व्हिडिओकॉन समूहाला आयसीआयसीआय बँकेने ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे प्रकरण ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २९ मार्च रोजी उघड केले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 11, 2018 12:51 pm