सहारा समूहाला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला आहे. सहारा समूहाचे प्रमुख सुब्रत रॉय यांनी १५०० कोटी रूपयांपैकी ९६६.८० कोटी रूपयांची उर्वरित रक्कम सेबी-सहारा खात्यात जमा करण्यासाठी वेळ मागितली होती. न्यायालयाने रॉय यांची ही मागणी फेटाळत आणखी वेळ देण्यास नकार दिला आहे.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने सेबीला निश्चित रक्कम न दिल्यामुळे अॅम्बी व्हॅलीचा लिलाव ठरलेल्या वेळेनुसार करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोणावळ्यात असलेल्या या भव्य दिव्य प्रकल्पाचा लिलाव रोखण्यासाठी सहारा समूहाने मागील महिन्यात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, न्यायालयाने तो प्रस्तावही फेटाळला होता.

न्यायालयाने सहारा समूहाला सुमारे २० हजार कोटी रूपये देण्यास सांगितले होते. सहारा समूहाच्या दोन योजनांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना ही रक्कम देण्यात येणार आहे.

गुंतवणूकदारांना पैसे परत न दिल्यामुळे रॉय हे सुमारे दोन वर्षे तुरूंगात होते. दि. ६ मे रोजी ते पॅरोलवर सुटले आहेत. त्यांच्या आईचे निधन झाल्यामुळे न्यायालयाने पहिल्यांदा त्यांना पॅरोल दिला होता. त्यानंतर सातत्याने त्यांच्या पॅरोलमध्ये वाढ होत आहे.