आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉन समूह आणि नू-पॉवर कंपनीसोबत केलेल्या व्यवहाराबाबत सेबीने आयसीआयसीआय बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांना नोटीस बजावली आहे. सेबी शेअर बाजाराचे नियमन करणारी संस्था आहे. नू-पॉवर कंपनीमध्ये दीपक कोचर यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप होत आहे.

दीपक कोचर चंदा कोचर यांचे पती आहेत. आयसीआयसीआय देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. आयसीआयसीआय बँकेने २०१२ मध्ये व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या ३,२५० कोटी रुपयांच्या कर्जा प्रकरणी सीबीआयने प्राथमिक तपास सुरु केला आहे. आयसीआयसीआय बँकेकडून कर्ज मिळाल्यानंतर व्हिडिओकॉन समूहाचे चेअरमन वेणूगोपाल धूत यांनी नू-पॉवर कंपनीमध्ये ६४ कोटी रुपये गुंतवल्याचे बोलले जाते.

नू-पॉवरची मालकी दीपक कोचर यांच्याकडे असल्याचे बोलले जाते. व्हिडिओकॉनला नियमानुसार कर्ज दिले असून त्यात काहीही चुकीचे केलेले नाही असे आयसीआयसीआय बँकेचे म्हणणे आहे. व्हिडिओकॉन समूहाला आयसीआयसीआय बँकेने ३२५० कोटी रुपयांचे कर्ज दिल्याचे प्रकरण ‘इंडियन एक्स्प्रेस’ने २९ मार्च रोजी उघड केले होते.

व्हिडिओकॉन समूह व त्याच्या प्रवर्तकांना आयसीआयसीआय बँकेने दिलेल्या कर्जाबाबतची तक्रार ‘एसएफआयओ’ कार्यालयाच्या मुंबई शाखेला यंदाच्या फेब्रुवारीमध्येच प्राप्त झाली होती. तक्रारीत आर्थिक गैरव्यवहारांची साशंकता व्यक्त करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. व्हिडिओकॉन समूहाने २००८मध्ये दीपक कोचर यांच्या सहकार्याने नू-पॉवर कंपनी स्थापली. आयसीआयसीआयकडून कर्जपुरवठा झाल्याने दुहेरी हितसंबंधांचा मुद्दा उपस्थित होतो हा प्रमुख आक्षेप आहे. पुढे व्हिडिओकॉन समूहाला कर्जाच्या बहुतेक हिश्श्याची परतफेड करता आलेली नाही, त्यामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.