अमेरिकेतील सत्तांतराच्या वेळी कॅपिटॉल हिल येथे निदर्शकांना हिंसाचारास उत्तेजन दिल्याप्रकरणी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील दुसऱ्या महाभियोगाचा मार्ग मोकळा झाला असून सहा रिपब्लिकन सदस्यांनी यात डेमोक्रॅटिक पक्षाला पाठिंबा दिला. त्यामुळे महाभियोगाच्या मुद्दय़ावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

मंगळवारी झालेल्या मतदानात सहा रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाला ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवण्याच्या बाजूने पाठिंबा दिला. ट्रम्प यांच्यावरील दुसऱ्या महाभियोगाच्या घटनात्मक वैधतेवर सेनेटमध्ये ५६ विरुद्ध ४४ असे मतदान झाले. २० जानेवारी रोजी ट्रम्प हे निवडणुकीतील पराभवानंतर पायउतार झाले असले तरी आता त्यांच्या विरोधात महाभियोग चालणार आहे.

सभागृहाचे महाभियोग व्यवस्थापक व वकील यांनी ट्रम्प यांच्या महाभियोगाची तयारी केली आहे. बुधवारपासून ट्रम्प यांच्या वकिलांना सेनेटमध्ये बाजू मांडण्यासाठी १६ तास दिले असून सभागृहाच्या महाभियोग व्यवस्थापकांनाही बाजू मांडण्यासाठी १६ तास दिले आहेत. त्यानंतर मतदान घेतले जाईल. रिपब्लिकन व डेमोक्रॅट यांची सदस्य संख्या सारखीच म्हणजे प्रत्येकी ५० आहे. ट्रम्प यांच्यावर महाभियोगाचा ठराव मंजूर करण्यासाठी ६७ मतांची गरज आहे. मंगळवारी महाभियोगाची घटनात्मक वैधता ठरवण्याच्या मुद्दय़ावर जे मतदान झाले त्यात सहा रिपब्लिकन सदस्यांनी महाभियोगाच्या बाजूने मतदान केले व अंतिम मतदानावेळी आणखी ११ रिपब्लिकन सदस्य फुटले तरच महाभियोग मंजूर होईल; पण सध्याच्या स्थितीत एवढे सदस्य फुटणे अशक्य मानले जात आहे.

ट्रम्प पहिलेच..

* राजकीय तज्ज्ञांच्या मते सर्व प्रक्रियेत ट्रम्प हे सहीसलामत सुटणार अशी स्थिती आहे. महाभियोग दोनदा दाखल करण्यात आलेले ट्रम्प हे अमेरिकी इतिहासातील पहिलेच अध्यक्ष आहेत. सत्तेवरून पायउतार झाल्यानंतरही महाभियोगाला सामोरे जाणारेही ते पहिले अध्यक्ष आहेत.

* रिपब्लिकन सदस्य सुसान कॉलिन्स, लिसा मुरकोवस्की, मिट रॉमनी, बेन सॅसी, बिली कॅसिडी, पॅट टुमी यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने मतदान केले. ट्रम्प यांच्यावरील महाभियोग हा बुधवारी दुपारी सुरू होणार आहे.

* तत्पूर्वी सभागृहाच्या महाभियोग व्यवस्थापकांनी घटनात्मकतेवर युक्तिवाद केला. त्या वेळी कॅपिटॉल हिल दंगलीचे चित्रीकरण दाखवण्यात आले. तोच आरोपातील मुख्य मुद्दा व पुरावा आहे. ६ जानेवारीला हा हिंसाचार झाला होता.

* डेमोक्रॅटिक पक्षाने चित्रीकरणाचा आधार घेत महाभियोग लढवण्याचे ठरवले आहे. दरम्यान, व्यवस्थितपणे बाजू मांडली नसल्यामुळे ट्रम्प यांनी आपल्या वकिलांवर नाराजी व्यक्त केली.