देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढवणारा होता. करोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ६४६ डॉक्टरांनी जीव गमवला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशननं याबाबतची माहिती दिली आहे. देशातील विविध राज्यांमध्ये करोना रुग्णांवर उपाचार करणाऱ्या ६४६ डॉक्टरांचा रुग्णांची सेवा करताना मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक डॉ़क्टरांचे मृत्यू हे दिल्लीत झाले आहे. त्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांत करोना रुग्णांची सेवा करताना डॉक्टराना प्राणाला मुकावं लागत आहे. दुसऱ्या लाटेत करोना रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण वाढला होता. करोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात टाकून रुग्णांची दिवस-रात्र सेवा करत होते.

या राज्यात सर्वाधिक डॉक्टरांचा मृत्यू

करोनाच्या दुसऱ्या लाटेत दिल्लीत १०९, बिहारमध्ये ९७, उत्तर प्रदेशात ७९, राजस्थानमध्ये ४३, झारखंडमध्ये ३९, गुजरातमध्ये ३७, आंध्र प्रदेशमध्ये ३५, तेलंगाणा ३४, तामिळनाडूत ३२, पश्चिम बंगालमध्ये ३०,महाराष्ट्रमध्ये २३, ओडिशामध्ये २३, मध्य प्रदेशात १६ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

देशात गेल्या २४ तासांत १,२०,५२९ नव्या बाधितांची नोंद

देशात गेल्या २४ तासात एक लाख २० हजार ५२९ नव्या करोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे देशातल्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १५ लाख ५५ हजार २४८ वर पोहोचली आहे. तर देशात काल दिवसभरात एक लाख ९७ हजार ८९४ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता दोन कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ वर पोहोचली आहे. देशातला रुग्ण बरे होण्याचा दर आता ९३.३८ टक्के झाला आहे. करोना विषाणू साथीची दुसरी लाट नियंत्रणात आल्याचे नमूद करीत ३७७ जिल्ह्यांमध्ये संसर्गदर ५ टक्क्यांपेक्षा खाली घसरल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने शुक्रवारी देण्यात आली. ७ मे रोजी दैनंदिन रुग्णसंख्येने शिखर गाठले होते, परंतु आता त्यांत ६८ टक्क्यांनी घट झाल्याचेही सांगण्यात आले. त्याचबरोबर लसीकरणात प्रौढांना प्राधान्य देण्यात येणार असून लहान मुलांबाबत तातडीने निर्णय होणार नसल्याचेही केंद्राने स्पष्ट केले.