देशातील सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत असून, राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाल्याचे केंद्रीय पथकाने अहवालात स्पष्ट केले. चाचण्यांची संख्या वाढविणे, रुग्णशोध मोहिमेस गती देणे आणि रुग्णालये, करोना केंद्रे सुविधासज्ज ठेवण्याच्या सूचना केंद्राने राज्याला दिल्या आहेत.

केंद्रीय पथकाने राज्यात ७ ते ११ मार्च या कालावधीत करोनास्थितीचा आढावा घेतला होता. राज्यात रुग्णशोध, चाचण्या, विलगीकरण आदींसाठी सक्रिय प्रयत्न मर्यादित स्वरूपात असून, ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये करोना नियमांचे योग्य पद्धतीने पालन होत नसल्याचा ठपका केंद्रीय पथकाने आपल्या अहवालात ठेवला आहे.

या पथकाने दिलेल्या अहवालाच्या आधारे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवले आहे. रात्रीची संचारबंदी, सप्ताहाअखेरीस टाळेबंदी आदी उपाययोजनांचा करोना नियंत्रणात मर्यादित परिणाम होत असून, कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना, चाचण्यावाढीवर भर देण्याची सूचना राजेश भूषण यांनी या पत्राद्वारे राज्याला केली आहे. सद्य:स्थितीत आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा पुरेशा असल्या तरी कोणत्याही स्थितीला सामोरे जाण्यासाठी नियोजन करावे, असेही या पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय पथकाने दौरा केलेल्या जिल्ह्याांमध्ये बाधितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आढळले. विशेषत: मुंबई आणि औरंगाबादमध्ये बाधितांचे प्रमाण मोठे आहे. चाचण्या कमी पडतात, असे त्यातून सूचित होते, असे या पथकाच्या अहवालात म्हटले आहे.

करोनाची लागण झालेल्या रुग्णांचा शोध मर्यादित स्वरूपाचा असल्याने लक्षणे नसलेल्या आणि पूर्वलक्षणे असलेल्यांचा शोध घेऊन त्यांच्या चाचण्यांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ करून आयसीएमआरच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, असेही पथकाच्या अहवालात म्हटले आहे. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी आणि कुटुंबातून होणाऱ्या संसर्गाचा योग्य पद्धतीने तपास करण्यात आला नाही, याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे. प्रतिबंधित क्षेत्र संकल्पना पुन्हा वेगाने राबवून आणि चाचण्या वाढवून बाधितांचे प्रमाण पाच टक्क्यांखाली आणण्याचे प्रयत्न करावेत, अशी सूचना राजेश भूषण यांनी राज्याला केली आहे.

राज्याला आठवड्याला २० लाख लसमात्रांची गरज

नवी दिल्ली : राज्याला दर आठवड्याला करोना प्रतिबंधक लशींच्या २० लाख मात्रांचा पुरवठा करण्याची मागणी राज्य सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राला पत्र लिहिले असून, यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांची भेट घेण्यासाठी टोपे मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर आले होते. लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला असून, राज्यात ६० वर्षांपेक्षा जास्त व सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. तसेच आरोग्यसेवक, करोनायोद्धे अशा एकूण एक कोटी ७७ लाख जणांसाठी पुढील तीन महिने राज्याला २.२० कोटी लशींच्या मात्रांची गरज असून, ‘कोव्हिशिल्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही लशींच्या मात्रा पुरवाव्यात, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

राज्यात १७,८६४ नवे रुग्ण

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत करोनाच्या १७,८६४ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ८७ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात मुंबई १९२२, नागपूर १९५१, पुणे शहर १९२५, नाशिक ५२१, औरंगाबाद ८६०, नांदेड ३८४, अमरावती २०१, अकोला २५१, वर्धा २१९, बीड २८५, पिंपरी-चिंचवड ८८०, उर्वरित पुणे जिल्हा ७४० नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या १ लाख ३८ हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्ह््यात सर्वाधिक २८,८१७ रुग्ण उपचाराधीन आहेत. मुंबई १३,८६२, ठाणे जिल्हा १३,५१०, नागपूर जिल्ह्याात १९,५५८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

पंतप्रधान-मुख्यमंत्री आज संवाद

नवी दिल्ली : देशात करोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र  मोदी हे आज, बुधवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे होणाऱ्या या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुण्यात बाधितांचे प्रमाण २३ टक्के

मुंबई, नागपूरप्रमाणेच पुण्यातही करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पुण्यात बाधितांचे प्रमाण उत्तरोत्तर चिंताजनक बनत आहे. गेल्या २४ तासांत पुण्यात करोनाचे १९२५ रुग्ण आढळले. चाचण्यांच्या तुलनेत हे प्रमाण २३.९ टक्के इतके नोंदले गेले.