विमान अपघातात मृत्यू न झाल्याचा खुल्या केलेल्या फाइलमध्ये उल्लेख
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या फाइल्स पश्चिम बंगाल सरकारने सार्वजनिक केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. नेताजींनी चेकच्या महिलेशी दुसरे लग्न केले आणि त्यांना निमा नावाची मुलगी असून तिला मुंबईहून अन्नधान्य पाठविण्यात येत असल्याचा उल्लेख एका फाइलमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे नेताजींनी ऑस्ट्रियाच्या महिलेशी लग्न केल्याचे नुकतेच उघड झाले होते.
नेताजींचा मृत्यू विमान दुर्घटनेत झाला नसल्याचा उल्लेख यामध्ये आहे. १२ मे, १९४८ मध्ये एका पत्राचा हवाला देण्यात आला आहे. नेताजींचा भाचा अरबिंदो बोस हे १९४७ मध्ये प्रागला एका विद्यार्थी परिषदेला गेले होते. यावेळी ही महिला त्यांना भेटली. यावेळी अरबिंदो यांना या महिलेने नेताजींच्या हस्ताक्षरातील तीन पत्रे दिली. यामध्ये क्रिप्स मिशचाही उल्लेख आहे. यावेळी तिने पहिली दोन पत्रे प्रकाशित करण्यास मान्यता दिली, मात्र तिसऱ्या पत्रात नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला नसल्याचा उल्लेख असल्याने ते पत्र प्रकाशित करण्यास तिने नकार दिला.
नेताजींना ऑस्ट्रियाच्या एमिली शेंकल या महिलेपासून अनिता नावाची मुलगी असल्याचे उघड झाले होते. मात्र, या दाव्यानुसार नेताजींनी दुसरे लग्न केल्याचे समजते. निमा या मुलीला पूर्वीच्या बॉम्बेमधून ३० पाऊंड धान्य जात असल्याचा उल्लेखही या फाइलमध्ये करण्यात आला आहे.
सुगाता बोस यांनी दावा फेटाळला
दरम्यान, हॉर्वर्ड विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक आणि नेताजींचे नातेवाईक सुगाता बोस यांनी हा केवळ मूर्खपणा असल्याचे म्हटले आहे. नेताजी यांची मुलगी अनिता आणि नवा दावा करण्यात आलेली निमा यांच्या नावात साधम्र्य असून तेव्हाच्या गुप्तचर यंत्रणांची काही तरी गफलत झाली असण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

नेताजींच्या फाइल्स केंद्रानेही उघड कराव्यात- ममता
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे योग्य मूल्यमापन त्यांनी देशासाठी भरीव कामगिरी करूनही झाले नाही, त्यामुळे त्यांच्याबाबतच्या वर्गीकृत फाईल्स केंद्र सरकारने खुल्या कराव्यात, अशी मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. पश्चिम बंगाल सरकारने नेताजींबाबतच्या ६४ फाईल्स खुल्या केल्या आहेत त्याचप्रमाणे केंद्रानेही त्यांच्याकडील फाईल्स खुल्या कराव्यात, असे बॅनर्जी यांनी विधानसभेत सांगितले. नेताजी यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात मोठे योगदान दिले होते तरी त्यांना म्हणावे तसे श्रेय मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे योग्य मूल्यमापन व्हावे यासाठी त्यांच्याबाबतच्या केंद्राकडे असलेल्या फाईल्सही खुल्या करण्यात याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.केंद्र सरकारने या फाईल्स खुल्या केल्या तर शेजारी देश व इतर काही देशांशी भारताच्या असलेल्या संबंधात अडचणी निर्माण होऊ शकतात असे कारण या फाइल्स उघड न करण्यामागे सरकारने यापूर्वी सांगितले आहे.