नासाने मंगळावर पाठवलेली रोव्हर गाडी ज्या पॅराशूटच्या माध्यमातून तेथे उतरवण्यात आली त्या पॅराशूटमध्ये एक गुप्त संदेश पाठवण्यात आला आहे.

‘परसिव्हिरन्स’ ही बग्गीसारखी गाडी मंगळावर अलीकडेच नासाने उतरवली आहे. अवकाशयान मोहिमेतील वैज्ञानिकांनी हा संदेश तयार करून पाठवला असल्याचे अभियंता आयन क्लार्क यांनी म्हटले असून तो बायनरी कोडमध्ये आहे. ७० फुटांच्या म्हणजे २१ मीटर पॅराशूटमध्ये ‘डिअर मायटी थिंग्ज’ हा संदेश असून तो नारिंगी व पांढऱ्या पट्टय़ांच्या स्वरूपात आहे. त्यात जीपीएस निर्देशांकांचा समावेश असून तो निर्देशांक हा पॅसाडेनाच्या जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेचे स्थान दर्शवणारा आहे.

क्लार्क हे ‘क्रॉसवर्ड’ छांदिष्ट असून त्यांनी दोन वर्षांपासून मंगळावर गुप्त संदेश पाठवण्याचे निश्चित केले होते. नायलॉन धाग्यांच्या स्वरूपात हा संदेश असल्याचे सांगण्यात आले.

हा संदेश गुरुवारी हे पॅराशूट तेथे उतरू लागले तेव्हा केवळ सहा जणांना माहिती होता. पॅराशूटने उतरण्यापूर्वी काही प्रतिमा नासाकडे पाठवल्या होत्या. त्यानंतर अवकाश शौकिनांनी त्या चित्रणाच्या माध्यमातून हा संदेश शोधून काढला. पुढच्या वेळी जास्त अवघड संदेश मंगळावर पाठवू म्हणजे त्यात सर्जनशीलता असेल असे क्लार्क यांनी म्हटले आहे.

जेपीएलच्या अभ्यागत केंद्राचा जीपीएस निर्देशांक त्यात आहे. ‘परसिव्हिरन्स’ या बग्गीसारख्या गाडीवर आधी पाठवण्यात आलेल्या गाडय़ांची छायाचित्रे असून त्यात त्यांचा वाढत गेलेला आकार दिसत आहे. या गाडीत इस्टरची अंडीही असून गाडीचा सात फूट बाहू फैलावला जाईल तेव्हा ती अंडी दिसू लागतील.

मंगळावर या पॅराशूटच्या मदतीने ‘रोव्हर गाडी’ उतरवण्यात आली. त्यावर संदेश लिहिलेला आहे.