अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल अजून जाहीर झालेला नाही. मागच्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मतमोजणीत डेमोक्रॅटिक उमेदवार जो बायडेन आघाडीवर आहेत. विजयासाठी त्यांना अवघ्या एका राज्याची आणि तिथल्या सहा मतांची आवश्यकता आहे. या उलट विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मार्ग खडतर आहे. जो बायडेन आज विजयाची औपचारिक घोषणा करु शकतात.
बायडेन यांच्या टीमने विजयाची तयारी सुरु केली असून, ते शुक्रवारी तशी घोषणा करु शकतात. आता सिक्रेट सर्व्हिसने देखील जो बायडेन यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त कुमक पाठवण्याची तयारी सुरु केलीय. द वॉशिंग्टन पोस्टने हे वृत्त दिले आहे. जो बायडेन यांनी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्षपद भूषवले आहे. बायडेन यांच्याभोवतीचा सुरक्षा घेरा आणखी मजबूत करण्यासाठी सिक्रेट सर्व्हिसने आपल्या एजंटसना पाचारण करण्यास सांगितले आहे.
विलमिंगटॉन कनव्हेन्शन सेंटरचा बायडेन आणखी एक दिवस वापर करणार असल्याचे त्यांच्या टीमकडून सिक्रेट सर्व्हिसला कळवण्यात आले आहे. सिक्रेट सर्व्हिसच्या महिला प्रवक्त्या कॅथरीन मीलहोन यांनी याबद्दल काहीही बोलण्यास नकार दिला. राष्ट्राध्यक्ष आणि उमेदवारांना देण्यात येणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल एजन्सी जाहीरपणे कधीच काही बोलत नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 6, 2020 1:09 pm