कर्नाटक पोलीसांनी सध्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आपल्या ताफ्यात काही नव्या शस्त्रांचा समावेश केला आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी तेल, कांदा, दही आणि चादर उपयोगी ठरत असल्याचा दावा खुद्द कर्नाटक पोलिसांनी केला आहे. कर्नाटकच्या बंगळुरू पोलीस ठाण्यातील पोलिसांकडे ही नवी शस्त्रे पाहून नागरिक देखील चक्रावले आहेत, पण कांदा, दही, तेल आणि चादर वापरून गुन्हेगारांना पकडण्यामागची नामी शक्कल खुद्द पोलिसांनी कथन करून या नव्या शस्त्रांचे समर्थन केले आहे.

चादर- एका पोलीस अधिकाऱयाने एका घटनेचे वर्णन करताना सांगितले की, चादर एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी उपयोगी ठरते. एकदा एका महिलेवर रस्त्यात धिंगाणा घातल्याचा आरोप होता. पोलिसांना या महिलेला ताब्यात घ्यायचे होते. पण महिला आरडाओरड करून आपण एड्स पीडित असून, कुणी आपल्या जवळ आल्यास चावा घेण्याची धमकी देत होती. त्यामुळे तिच्या नकळत चादर अंगावर टाकून तिला ताब्यात घेण्यात आले.

कांदा आणि दही- बहुतेक वेळेस नशेत धुंद असलेल्या तरुण-तरुणींवर ताबा मिळवताना पोलिसांच्या नाकी नऊ येतात. नशेत धुंद असलेल्या आरोपींना ताब्यात घेताना त्यांची नशा उतरविण्यासाठी कांदा आणि दही उपयोगी ठरते, असे पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

तेल- बंगळुरू पोलीस कोणत्याही आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या पायातील चपला ताब्यात घेऊन आरोपीच्या तळव्यांना तेल लावतात. जेणेकरून तो पळ काढणार नाही.

दरम्यान, या सर्व वस्तू आरोपींवर अंकुश ठेवण्यासाठी उपयोगी ठरत असल्याचा दावा कर्नाटक पोलीसांनी खुल्या मनाने केला आहे.