उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारचे तीन मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. एका खासगी वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशननंतर तीन मंत्र्यांच्या स्वीय सहायकांना अटक करण्यात आली आहे.

विधानसभेच्या परिसरात हे 3 जण अधिकाऱ्यांच्या बदल्या करून देणे आणि कंत्राट मिळवून देण्यासाठी लाच घेताना रंगेहात पकडले गेले असा आरोप आहे. तिघांनाही न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे.

योगी सरकारमधील मागास वर्ग कल्याण मंत्री ओमप्रकाश राजभर यांचे स्वीय सहायक ओमप्रकाश कश्यप, उत्खनन मंत्री अर्चना पांडेय यांचे स्वीय सहायक एसपी त्रिपाठी आणि मूलभूत शिक्षण मंत्री संदीप सिंह यांचे स्वीय सहायक संतोष अवस्थी यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या हजरतगंज पोलिसांनी ही अटक केली. याशिवाय, योगी आदित्यनाथ यांनी तिन्ही अधिकाऱ्यांचं निलंबन केलं असून चौकशीसाठी एसआयटी नेमली आहे. आदित्यनाथ यांनी लखनौचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश राजीव कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नेमली असून  यात एसटीएफचे पोलिस महानिरीक्षक आणि आयटीचे विशेष सचिव राकेश वर्मा यांचाही समावेश आहे.