टिपू सुलतान या मुस्लिम शासकाची जयंती कर्नाटकात दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा भाजपा आणि काही हिंदुत्ववादी गटांनी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यावर आक्षेप घेतला असून सरकारी कार्यक्रम उधळून लावण्याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अतिसंवेदनशील दोन शहरांमध्ये कर्नाटक पोलिसांकडून जमाव बंदीचे १४४ कलम लागू केले आहे. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी प्रकृती अस्वास्थ्यामुळे या सरकारी कार्यक्रमाला हजर राहणार नाहीत.

सन २०१६ पासून कर्नाटकात १० नोव्हेंबर रोजी टिपू सुलतानची जयंती साजरी करण्यात येत आहे. मात्र, यंदा यावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारने हुबळी आणि धारवाड या शहरांमध्ये जमावबंदी लागू केली आहे. १० आणि ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ आणि ७ वाजल्यापासून या शहरांमध्ये कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. यानुसार, येथे एकाच ठिकाणी चार पेक्षा अधिक लोक जमा होऊ शकणार नाहीत.

राज्य सरकारने यापूर्वी टिपू सुलतान जयंतीनिमित्त राज्यांतील धार्मिक वातावरण बिघडवणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता. भाजपा जाणीवपूर्वक टिपू सुलतान जयंतीवरुन धार्मिक सौहार्द बिघडवण्याचे काम करीत आहे. जर भाजपाने काही चुकीचे काम केले तर त्यांना कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याबद्दल कारावाईला समोरे जावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कितीही आंदोलने केली तरी कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय हा जयंतीचा कार्यक्रम पार पडणार असल्याचेही कर्नाटक सरकारने म्हटले होते.

दरम्यान, कर्नाटक भाजपाचे अध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी काही दिवसांपूर्वी टिपू सुलतानच्या जयंती कार्यक्रमाला विरोध करताना म्हटले होते की, आम्ही टिपू जयंतीला विरोध करणार आहोत. या जयंतीचे कोणीही समर्थन करणार नाही. राज्याच्या हितासाठी सरकारने हा कार्यक्रम थांबवायला हवा. टिपू सुलतानची जयंती साजरी करून सरकार केवळ मुस्लिम समाजाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे.