भारतासाठी बुधवारी महत्त्वाचा दिवस असून पाच राफेल विमानांचा पहिल ताफा दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर हरियाणामधील अंबाला हवाई तळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. अंबाला जिल्हा प्रशासनाने हवाई तळाजवळ १४४ कलम लागू केलं आहे. यासोबतच फोटो काढण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. फ्रान्समधून उड्डाण करण्यात आलेली राफेल लढाऊ विमानं बुधवारी भारतात दाखल होणार आहेत.

“उद्या राफेल विमानांचं लँडिंग होणार असल्याने जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर आहे. अंबाला हवाई तळाजवळ असणाऱ्या चार गावांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. छतांवर लोकांना गर्दी करण्यापासून तसच लँडिंग दरम्यान कोणतीही फोटोग्राफी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे,” अशी माहिती अंबालाचे वाहतूक डीएसपी मुनिश सेहगल यांनी दिली आहे.

जमावबंदी जाहीर करण्यात आली असल्याने चारपेक्षा जास्त लोक एकत्रित येण्यावर बंदी असणार आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनाने अंबाला हवाई तळापासून तीन किमी अंतरापर्यंत ड्रोन फिरण्यावर बंदी आणली आहे. नियमांचं उल्लंघन करु नये असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नो ड्रोन झोनमध्ये ड्रोन दिसल्यास जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

पाच राफेल विमानांचा पहिला ताफा फ्रान्समधून भारताकडे येण्यास निघाला असून ही विमाने करारानुसार देण्यात येत आहेत. बहुउद्देशी असलेले हे लढाऊ विमान असून बुधवारी ही विमाने अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर येणार आहेत. राफेल विमानांच्या खरेदीचा करार भारताने पाच वर्षांपूर्वी केला होता. भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी ३६ विमाने देणार असून त्यासाठी ५९ हजार कोटींचा करार झाला होता. फ्रान्सनमधील बोर्डक्स विमानतळावरून या विमानांनी उड्डाण केले असून ती संयुक्त अरब अमिरातीत एक थांबा घेऊन सात हजार कि.मीचे अंतर कापून भारतात येणार आहेत.

फ्रान्सने भारताला यापूर्वीही जग्वार, मिराज, मायसियर विमानांचा पुरवठा केला होता. एकूण दहा राफेल विमाने तयार असून त्यातील पाच देण्यात आली आहेत तर पाच अजून प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फ्रान्समध्येच आहेत. फेब्रुवारी २०२१ पर्यंत भारताला सर्व ३६ राफेल विमाने दिली जाणार आहेत.