काही दिवसांपासून हिंसाचाराचा उद्रेक झालेल्या दक्षिण कन्नड जिल्ह्य़ातील स्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. १८ व्या शतकातील राज्यकर्ता टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हिंदू संघटनांनी विरोध केल्यानंतर येथे हिंसाचाराचा उद्रेक झाला होता.
शहरात रविवारी जारी करण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश सोमवारी मागे घेण्यात आले आहेत; तथापि जाहीर सभा, निषेध मोर्चा, बंद आणि रास्ता रोको यावर २० नोव्हेंबपर्यंत बंदी घालण्यात आली आहे, असे उपायुक्त ए. बी. इब्राहिम यांनी सांगितले. शहर पोलिसांना सहकार्य करण्यासाठी शीघ्र कृतिदलाच्या दोन कंपन्या शहरातील संवेदनक्षम भागांत तैनात करण्यात आल्या आहेत. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे.टिपू सुलतान यांच्या जयंतीवरून निर्माण झालेल्या वादात ज्येष्ठ साहित्यिक, नाटय़लेखक गिरीश कर्नाड यांनी उडी घेतली होती. बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वातंत्र्यसैनिक केम्पेगौडा यांच्याऐवजी टिपूचे नाव देण्याची सूचना करून त्यांनी रोष ओढवून घेतला होता.