काश्मीरमधील असंतोष अटोक्यात आणण्यासाठी हुर्रियतसह सर्वसंबंधितांशी चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ जम्मू- काश्मीरमध्ये दाखल झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय खासदारांचे ३० सदस्यांचे शिष्टमंडळ दोन दिवसांच्या काश्मीर दौऱ्यावर  आहे. पहिल्या दिवशी काश्मीरमधील हिंसाचारातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाला भेटण्याचे निमंत्रण काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी हुर्रियत नेत्यांना दिले होते. मात्र हुर्रियत नेत्यांनी पहिल्या दिवशी सर्वपक्षीय शिष्टाचारमंडळाला भेट देण्यास साफ नकार दिला.  त्यामुळे सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या भेटीचा पहिला दिवस फारसा निराशाजनक राहिला.  हुर्रियत कॉन्फरन्सच्या सय्यद अली गिलानी आणि जेकेएलफच्या यासिन मालिक या राजकीय नेत्यांनी शिष्टमंडळाला भेटण्यास नकार दिल्याचे समजते. मात्र, शिष्टाचार मंडळाचे सदस्य शरद यादव यांनी पहिल्या दिवशीची बैठक ठिक पार पडल्याचे म्हटले आहे. बुरहान वानीवर लष्कराने केलेल्या कारवाईनंतर काश्मीरमधील वातावरण अजूनही शांत झालेले नाही. लष्कराने  बुरहान वानीवर केलेल्या कारवाईनंतर फुटीरतावाद्यांनी  काश्मीर खोऱ्यात बंदची हाक दिली होती.