देशभरामध्ये सुधारित नागरी काद्यावरुन आंदोलने सुरु असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका बड्या नेत्याने वादग्रस्त विधान केलं आहे. “राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेल्या धर्मनिरपेक्ष शब्दाचा पुनर्विचार व्हावा,” असं मत संघाच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असणाऱ्या जे नंदकुमार यांनी व्यक्त केलं आहे. आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

काय कारण दिले हा शब्द वगण्याच्या मागणीसाठी?

“धर्मनिरपेक्षता ही पाश्चिमात्य संकल्पना आहे. ही संकल्पना आपल्याकडे पश्चिमेकडून आली आहे. या संकल्पनेचे मूळ हे पोपच्या वर्चस्वाला विरोध करण्यामध्ये आहे. त्यामुळे भारताला धर्मनिरपेक्षतेची गरज नाही,” असं मत नंदकुमार यांनी व्यक्त केलं आहे. भारताच्या संविधानामध्ये भारत हा लोकशाही संघराज्य, स्वायत्त, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष देश असेल असं नमूद करण्यात आलं आहे. मात्र यामधील धर्मनिरपेक्ष या शब्दाबद्दल पुन्हा विचार करण्याची गरज असल्याचे नंदकुमार यांनी म्हटलं आहे.

“इंदिरा यांनी शब्दाचा समावेश केला”

“बाबासाहेब आंबेडकर, कृष्णस्वामी अय्यर या सर्वांनी ‘धर्मनिरपेक्षता’ शब्दाला विरोध केला होता. संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये याची गरज नसल्याचे या सर्वांचे मत होते. याविषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर हा शब्दाचा समावेश न करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यानंतर १९७६ इंदिरा गांधी यांनी बळजबरीने या शब्दाचा संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये समावेश केला,” असं यावेळी बोलताना नंदकुमार म्हणाले.

पाटी लावायची की…

नंदकुमार यांनी लिहिलेल्या ‘हिंदुत्व इन द चेंजिंग टाइम्स’ या पुस्तकाचे काही दिवसापूर्वी दिल्लीमध्ये प्रकाशन झाले. या पुस्तकामध्ये नंदुकमार यांनी ‘पश्चिम बंगालचे इस्लामीकरण’ करण्याच्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. याचसंदर्भात बोलताना, “आपण धर्मनिरपेक्ष आहोत अशा पाट्या गळ्यात लटकवून घ्यायच्या की आपण आपल्या कृतीमधून आणि वर्तवणूकीतून ते दाखवून द्यायचं हे ठरवायला हवं,” असं मत नंदकुमार यांनी व्यक्त केले आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द राज्यघटनेमध्ये असावा की नाही याबद्दलचा निर्णय राजकीय चर्चेमधून घेण्याऐवजी समाजाने घेण्याची गरज असल्याचेही नंदुकमार यावेळी म्हणाले. नंदकुमार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘प्रजन प्रवाह’चे संयोजक आहेत. ‘प्रजन प्रवाह’ ही संघाशी संबंधीत वैचारिक आणि तज्ज्ञांची समिती (थींक टॅक) आहे. त्यामुळेच नंदकुमार यांच्या या मताला अधिक महत्व प्राप्त झालं आहे.

केंद्र सरकारकडे याबद्दल मागणी करणार का?

‘धर्मनिरपेक्षता’ शब्द वगळण्यात यावा यासंदर्भात केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या भाजपाकडे काही मागणी करणार आहात का असा प्रश्न नंदुकमार यांना विचारण्यात आला. त्यावेळी नंदकुमार यांनी प्रश्न विचारणाऱ्याकडे केवळ हसून पाहिले. मात्र यावर कोणतेही उत्तर त्यांनी दिले नाही.