परस्परांशी चॅट करण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांना आता अन्य बाहेरच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. लष्कराने स्वत:च सुरक्षित मोबाइल अ‍ॅप्लिकेशन विकसित केलं आहे. त्यावरुन ते परस्परांशी चॅट करु शकतात. आत्मनिर्भर भारत अभियानातंर्गत भारतीय लष्कराने सोपं आणि सुरक्षित मेसेजिग अ‍ॅप्लिकेशन विकसित केलं आहे.

त्याला ‘सेक्युर अ‍ॅप्लिकेशन फॉर इंटरनेट’ (साई) असे नाव दिल्याचे लष्कराकडून गुरुवारी सांगण्यात आले. व्हॉटसअ‍ॅप, टेलिग्राम, जीआयएमएस सारख्या व्यावसायिक मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन सारखेच हे मोबाइल अ‍ॅप्लिकेशन आहे.

“अ‍ॅड्रॉइड प्लॅटफॉर्मवरुन इंटरनेटद्वारे टेक्सट आणि व्हिडीओ कॉलिंग करता येईल. इन हाऊस सर्व्हरसह कोडिंगची सुरक्षेचे सर्व फिचर या साई अ‍ॅपमध्ये आहेत” असे लष्कराकडून सांगण्यात आले. परस्परांशी संवाद साधण्यासाठी लष्करी अधिकाऱ्यांकडून व्यावसायिक मोबाइल अ‍ॅप्लिकेशनचा वापर करताना सुरक्षेशी तडजोड होण्याचा धोका होता, त्यामुळे लष्करासाठी सुरक्षित मेसेजिग अ‍ॅपची गरज होती.