भारत व थायलंडच्या नौदलाने बुधवारी अंदमान सागरात तीन दिवसांची संयुक्त गस्त मोहीम सुरू केली आहे. चीनने हिंदी महासागरात सागरी अस्तित्व वाढवल्याने दोन्ही देशांनी ही मोहीम हाती घेतली आहे.

भारतीय नौदलाचे आयएनएस शरयू व थायलंडचे क्रॅबी हे जहाज या मोहिमेत सहभागी असून दोन्ही नौदलांनी डार्नियर सागरी गस्त विमानांचाही वापर यात केला आहे. भारत व थायलंड यांची ही आतापर्यंतची ३१ वी संयुक्त गस्त मोहीम असून दोन्ही नौदले दर दोन वर्षांनी अशा प्रकारे संयुक्त कवायती करीत असतात. २००५ पासून या कवायतींचा प्रस्ताव मांडला गेला नंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली. हिंदी महासागरात आता सुरू असलेल्या कवायती हा त्याचाच भाग आहे, असे नौदलाचे प्रवक्ते कमांडर विवेक मधवाल यांनी सांगितले.

कोरपॅट नावाने या कवायती प्रसिद्ध असून त्या दोन देशांच्या नौदलां दरम्यान होतात. सागरी प्रदेशातील अवैध मासेमारी, अमली पदार्थ तस्करी, सागरी दहशतवाद, सशस्त्र दरोडे व चाचेगिरी रोखण्यासाठी त्याची गरज असते, असे त्यांनी म्हटले आहे. या कवायतींमुळे दोन्ही देशांत माहितीची देवाणघेवाण होते. तस्करीचे प्रयत्न रोखण्यास मदत होते. अवैध स्थलांतर व इतर गोष्टींना आळा बसतो. भारतीय नौदलाच्या सागर म्हणजे ‘सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन’ या कवायतींमध्ये हिंदी महासागरातील देशांशी प्रादेशिक सागरी सुरक्षा माहितीची देवणाघेवाण होते.

३१ व्या कोरपॅट कवायती या भारत व थायलंड यांच्या दरम्यान होत असून थायलंडच्या नौदलाशी सहकार्य वाढणार आहे, असे मधवाल यांनी सांगितले. भारतीय नौदल हिंदी महासागरात काही वर्षात अस्तित्व वाढवित असून करोना साथीनेही त्यात अडथळा येऊ न देता गेल्या काही महिन्यात अनेक देशांबरोबर नौदल सराव करण्यात आला.