04 August 2020

News Flash

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘लाल किल्ला’ परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ

भाजपच्यावतीने देशभरात 'तिरंगा यात्रेचे' आयोजन

दिल्लीतील लाल किल्ला (संग्रहित छायाचित्र)

भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ‘लाल किल्ला’ आणि परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लाल किल्ल्यावर दरवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते झेंडावंदनाच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यावेळी पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचा आढावा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार आहेत.

सर्जिकल स्ट्राईक, नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी या गेल्या वर्षभरात मोदी सरकारने केलेल्या महत्वाच्या कामगिरी आहेत. त्याचबरोबर या काळात सीमेपलिकडून झालेली घुसखोरी, पाकिस्तानी सैन्याकडून अनेकदा करण्यात आलेले शस्त्रसंधीचे उल्लंघन, चीनच्या वाढत्या कुरापती अशा घटनाही घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशाचा स्वातंत्रदिन शांततेत पार पाडावा यासाठी राजधानीतील महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी करणार असलेल्या भाषणाची तयारीही सुरु असल्याचे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. याद्वारे गेल्या वर्षी पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आश्वासनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने आपल्या कामगिरीचा अहवाल तयार केल्याचे कळते. यामध्ये आठ महत्त्वाच्या घोषणांचा यात समावेश असणार आहे. यामध्ये ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजना’, ‘ऊर्जा समृद्ध भारत’, ‘शेतकरी कल्याणकारी योजना’, ‘सुदृढ भारत’, ‘आधारची अंमलबजावणी’ यांसारख्या मुद्यांचा समावेश असणार आहे.

त्याचबरोबर भाजपच्यावतीने देशभरात ‘तिरंगा यात्रा’ काढण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनानंतर लगेचच या यात्रेला सुरुवात होणार आहे. यामध्ये विविध गटांचे नेते प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचणार आहेत. भाजपचे प्रत्येक खासदार आपल्या मतदार संघात ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’ चा जयघोषही करणार आहेत. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या तिरंगा यात्रेची कल्पना मांडली होती. त्यावेळी सात दिवसांसाठी या यात्रेचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी ही यात्रा १६ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्याच्या सूचना मोदींनी भाजप कार्यकर्त्यांना केल्या आहेत. त्याचबरोबर दरवर्षी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2017 6:48 pm

Web Title: security around delhis red fort and nearby areas increased in the wake of upcoming independence day celebrations
Next Stories
1 पाकिस्तानी दहशतवादाला चीनकडून खतपाणी: रामदेव बाबा
2 अबू दुजाना ‘लष्कर’चा नव्हे, ‘अल कायदा’चा दहशतवादी: झाकिर मुसा
3 १४ वर्षांच्या मुलीची शपथ; श्रीनगरच्या लाल चौकात फडकवणार राष्ट्रध्वज
Just Now!
X