16 December 2017

News Flash

दिल्लीत सुरक्षा वाढवली; १० मेट्रो स्थानके बंद

राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित तरूणीचा आज (शनिवार) पहाटे सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू

नवी दिल्ली | Updated: December 29, 2012 1:40 AM

राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेतील पीडित तरूणीचा आज (शनिवार) पहाटे सिंगापूरमधील रुग्णालयात मृत्यू झाल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली असून १० मेट्रो स्थानकेही बंद ठेवण्यात आली आहेत.
दिल्लीतील प्रमुख ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून इँडिया गेटवरही पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. विजय चौक, इंडिया गेट परिसराकडे येणारे सर्व रस्ते बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिल्ली वाहतूक पोलिसांनी ट्विटरवरून दिली आहे. दिल्लीतील पटेल चौक, रेस कोर्स, खान मार्केट, उद्योग भवन, मंडी हाऊस, बारखंबा रोड आणि प्रगती मैदान ही मेट्रो स्थानके सरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आली आहेत.
सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर गेल्या आठवड्यात दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली होती. काही ठिकाणी या आंदोलनांना हिंसक वळमही प्रप्त झाले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. पीडित तरूणीच्या मृत्यूनंतर असाच जनक्षोभ पुन्हा उसळू शकतो, त्यामुळे खबरदारी घेत पोलिसांनी दिल्लीतील अनेक मार्गांमध्ये बदल करत जागोजागी पोलिसांना उभे केले आहे. दिल्ली पोलिसांतर्फे नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेचे भान ठेवून आज (शनिवार) सकाळपासूनच दिल्लीत विविध ठिकाणी नागरिकांतर्फे मूक मोर्चे काढण्यात येत आहेत.  

First Published on December 29, 2012 1:40 am

Web Title: security beefed up in delhi 10 metro stations shut