पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान एक तरूण सुरक्षा यंत्रणा भेदून मोदींपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांच्यादृष्टीने ही घटना म्हणजे धोक्याची घंटा मानली जात आहे. गेल्या शनिवारी श्रीलंका दौऱ्यादरम्यान जाफना येथे एका सार्वजनिक कार्यक्रमाच्यावेळी हा प्रकार घडल्याचे समजते. यावेळी सुरक्षा कडे पार करून संबंधित तरूण मोदींशी हस्तांदोलन करू शकेल, इतक्या अंतरावर पोहोचला होता. इतकेच नव्हे तर या तरूणाने मोदींच्या गाडीत शिरण्याचादेखील प्रयत्न केला.
सूत्रांच्या माहितीनुसार, विशेष सुरक्षा दल (एसपीजी) सध्या या प्रकरणाची चौकशी करत असून, हा तरूण ज्या भागातून सुरक्षा यंत्रणा भेदून आत आला त्याठिकाणच्या सुरक्षेची जबाबदारी एसपीजीच्या दोन अधिकाऱ्यांवर होती. या चौकशीवर सध्या पंतप्रधान कार्यालयासह रॉ, परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालय नजर ठेवून आहेत.
१४ मार्च रोजी दुपारी चार वाजता झालेल्या या कार्यक्रमात मोदींनी इलावली या स्थानिक गावातील घरवाटप योजनेतील लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. त्यानंतर मोदी परत जाण्यासाठी व्यासपीठाच्या मागील बाजूस पार्क केलेल्या गाडीपाशी आले. त्यावेळेस अचानकपणे शर्ट आणि ट्राऊजर पँट परिधान केलेला विशीतला एक तरूण मोदींपाशी आला आणि त्याने मोदींना हात मिळवायचा प्रयत्न केला. मात्र, ही गोष्ट ध्यानात येताच एसपीजीच्या अधिकाऱ्यांनी या तरूणाला लगेच अडवले. हा तरूण त्यावेळी मोदींना स्पर्श करू शकला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
या तरूणाने एसपीजीच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, त्याला नरेंद्र मोदींबरोबर हस्तांदोलन करायचे होते आणि त्यांच्यासोबत छायाचित्रही काढायचे होते. एसपीजीने प्राथमिक चौकशी केल्यानंतर या तरूणाला श्रीलंकेच्या पोलीसांच्या हवाली केले. कडेकोट सुरक्षा असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तुला प्रवेश कसा काय मिळाला, असा प्रश्न चौकशीदरम्यान या तरूणाला विचारण्यात आला होता. त्यावेळी त्याने जाफना येथील भारतीय दुतावासातील काही अधिकाऱ्यांची नावे सांगितली. दरम्यान, या चौकशीदरम्यान श्रीलंकेच्या पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळाल्याचे भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांकडून ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्राला सांगण्यात आले. तसेच चौकशीनंतर या तरूणाला सोडून देण्यात आले आहे.
जाफना येथून १६ किमी अंतरावर असलेल्या गावात हा कार्यक्रम झाला होता. या घटनेनंतर कार्यक्रमाचे व्यासपीठ आणि प्रेक्षकांसाठी उभारलेला निळ्या रंगाचा तंबू या गोष्टी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी स्वत:ही सुरक्षा यंत्रणेत त्रुटी राहिल्याच्या या घटनेची गंभीर दखल घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.