भारतीय सैन्याला जम्मू-काश्मीरमधील चकमकीत लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले आहे. उफैद फारूख लोन असे या दहशतवाद्याचे नाव असून, अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा सहभाग होता. याचबरोबर ५ ऑक्टोबर रोजी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग येथील उपायुक्त कार्यालयावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे उफैदचा हात होता. या हल्ल्यात १४ जण गंभीर जखमी झाले होते.

याशिवाय काश्मीर खोऱ्यातील दुकानदार, फळ विक्रेते, पेट्रोलपंप चालकांना धमकावणे, मारहाण करणे आदींमध्ये देखील त्याचा सहभाग होता. केंद्र सरकारकडून जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्यात आल्यापासून पाकिस्तानबरोबरच दहशवतादी संघटना देखील अधिकच चवातळलेल्या असल्याचे दिसत आहे. काश्मीर खोरे अशांत ठेवण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

भारतीय सैन्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, या दहशतवाद्यास ठार करण्यासाठी भारतीय सेनेचे जवान व राज्य पोलीसांच्या तुकडीद्वारे सोमवारी मध्यरात्रीपासून विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती. अखेर चकमकीनंतर या दहशतावाद्याचा मृतदेह जवानांच्या हाती आला आहे. उफैद हा अवंतीपोरा येथील रहिवासी होता.