जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांसाठी रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पाकिस्तान पुरस्कृत जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना लष्कर किंवा निमलष्करी दलाच्या ताफ्याला आज लक्ष्य करु शकते. कार बॉम्ब किंवा आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवण्याची शक्यता सुरक्षा दलांनी व्यक्त केली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेने रियाज नायकूच्या जागी गाझी हैदर ऊर्फ सैफुल्लाह मीरची काश्मीरचा नवीन कमांडर म्हणून नियुक्ती केली आहे. सुरक्षा दलांनी मागच्या आठवडयात रियाज नायकूचा खात्मा केला होता. जैशकडून हल्ला होण्याची टीप आणि गाझी हैदरची नियुक्ती दोन्ही घटना एकाचवेळी घडल्या आहेत.

जैश-ए-मोहम्मदपासून सुरक्षा दलाच्या ताफ्याला धोका आहे. त्यामुळे जैशचा हल्ल्याचा कट उधळून लावणे ही सुरक्षा दलांची सध्याच्या घडीला पहिली प्राथमिकता आहे. दहशतवादी अनेक दिवसांपासून कटाची आखणी करत असून आज हा हल्ला होऊ शकतो. इंटेलिजन्सच्या रिपोर्टनुसार, मागच्या आठवडयात अब्दुल रौफ असगरने आयएसआयच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

मसूद अझहर जैशचा प्रमुख असला तरी सूत्र मात्र सध्या अब्दुल रौफ असगरच्या हाती आहेत. सौदी अरेबियात लढल्या गेलेल्या बदरच्या लढाईत काहीशे सैनिकांनी विजय मिळवला होता. इस्लामिक इतिहासात याकडे मोठा विजय म्हणून पाहिले जाते. त्यामुळे ११ मे रोजी हल्ला होण्याचा सुरक्षा दलांचा अंदाज आहे. त्याशिवाय आजच्याच दिवशी १९९८ साली पोखरणमध्ये भारताने अणूबॉम्बची यशस्वी चाचणी केली होती. त्या घटनेला २२ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे दहशतवादी आजच्याच दिवशी हा हल्ला करु शकतात.