छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे आज (सोमवार) मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील नक्षलग्रस्त म्हणून अतिसंवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दंतेवाडा येथे शांततेत मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. येथे मतदान १२ तासांवर आले असताना नक्षलवाद्यांनी रविवारी घडवलेल्या आयईडी स्फोटात सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला, तर पोलिसांशी झालेल्या चकमकीत एक माओवादी ठार झाला आहे.


दरम्यान, छत्तीगढमध्ये पहिल्या टप्प्यात १० विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानासाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार असून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान सुरु राहणार आहे. तर राजनंदगाव येथील पाच मतदारसंघात आणि बस्तर येथील ३ मतदारसंघांमध्ये सकाळी ८ ते ५ यावेळेत नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात माहिती दिली आहे.


राज्यातील नक्षलप्रभावित विजापूर जिल्ह्यातील आलापल्ली येथे नक्षलवाद्यांनी २७ ऑक्टोबरला बुलेट प्रुफ बंकर सुरंगाने उडवले होते. या घटनेत सीआरपीएफच्या १६८ बटालियनचे ४ जवान शहीद झाले होते. तर २९ तारखेला नक्षलवाद्यांनी दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार गावातील जिल्हा पंचायत सदस्य तसेच भाजपा नेते नंदलाल मुड्यामी गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांनी ३० ऑक्टोबर रोजी केलेल्या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह दूरदर्शनच्या एक कॅमेरामनचाही मृत्यू झाला होता.