नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील जलसाठा 90 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणातून विसर्गही करण्यात येत आहे. लोकांची वर्दळ वाढल्याने दुर्घटना टाळण्यासाठी  जायकवाडी धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत चांगला पाऊस झाल्याने कोरड्याठाक असलेल्या मराठवाड्यातील जायकवाडी धरण भरले आहे. नाथसागर भरल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र आता पर्यटकांना धरणाच्या भिंतींवर जाण्यापासून रोखण्यात आले आहे. तर परिसरात खासगी गार्ड आणि पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यामुळे जायकवाडी धरणावर सुरक्षेच्या बाबतीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पूर्वी धरणावर चार पोलीस कर्मचारी कार्यरत होते. आता त्यात वाढ करण्यात आली असून धरणावर १२ सशस्त्र पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जलसंपदा विभागाच्या वतीनेही खासगी सुरक्षा गार्ड वाढवून सर्व बाजूच्या चौक्यावर २४ तासांचा खडा पहारा ठेवणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर लष्कर ए तोयबाचे दहशतवादी तामिळनाडूत घुसल्याची बातमी गुप्तचर विभागाने दिल्यानंतर देशातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवरही धरणाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गुप्तचर विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी आता खासगी व्यक्तींना धरणावर जाण्यास बंदी केली आहे. तसेच शासकीय कर्मचारी यांनासुद्धा गेटवर ओळखपत्राची खात्री झाल्याशिवाय प्रवेश देण्यात येऊ नयेत, असे आदेश देण्यात आले आहे.