संसद भवन परिसरात एका खासदाराची कार तपासणीसाठी न थांबता पुढे जात बॅरिकेट्सला धडकल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अनपेक्षतपणे घडलेल्या या प्रकारामुळे सुरक्षा व्यवस्था हाय अॅलर्टवर गेली आणि क्विक अॅक्शन फोर्सच्या जवानांनी तत्काळ संसदेला वेढा दिला.


संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरु असल्याने नेहमीप्रमाणे खासदार भवन परिसरात आपल्या कारमधून येत होते. दरम्यान, काँग्रेसचे मणिपूरचे खासदार थोकचोम मेनिया यांची कार तपासणीसाठी सुरक्षा रक्षकांजवळ न थांबता तशीच थेट पुढे गेली आणि बॅरिकेट्सला जाऊन धडकली. त्यामुळे परिसरात मोठ्या इशाऱ्याचा अलार्म वाजायला लागला. त्यामुळे संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेची धांदल उडाली. सुरक्षा व्यवस्था तत्काळ हाय अॅलर्टवर गेली. जवानांनी शस्त्र सज्ज होत संपूर्ण भवनाला वेढा दिला. या घटनेचा तपास सुरक्षा यंत्रणा घेत आहेत. तसेच खासदार मेनिया यांनाही तत्काळ अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली.

या घटनेनंतर ताबडतोड क्वीक अॅक्शन फोर्सने आपल्या जागा घेतल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमध्ये कोणालाही नुकसान झालेले नाही. मात्र, ज्यावेळी कार बॅरिकेट्सला धडकली तेव्हा ड्रायव्हरच्या सीटवरील एअर बॅग उघडले गेले.

सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून ते १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या काळात संसद परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात असते. अशी सुरक्षा व्यवस्था असतानाही ही घटना घडल्याने भवन परिसरात काहीकाळ गोंधळाचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.