दिल्लीवर दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याने इंदिरा गांधी विमानतळ आणि मेट्रो स्टेशनवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जवानांचे कपडे मिळवण्यात ७ दहशहतवादी यशस्वी ठरले आहेत. आयबीने दिलेल्या माहितीनुसार ७ दहशतवादी चकरी आणि गुरदासपूरच्या सीमेवरील पोस्टजवळ दिसले होते. त्यांना सुभेदार आणि कॅप्टन रँकच्या अधिकाऱ्यांचे कपडे मिळाले आहेत. याचा उपयोग ते घुसखोरी करण्यासाठी करू शकतात. विमानतळ आणि मेट्रो स्टेशनबरोबर पंजाबमध्ये निवडणुकीच्या कामासाठी तैनात करण्यात आलेल्या जवानांनाही अलर्ट राहण्यास सांगितले आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार दिल्ली विमानतळावरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांसमोरील अडचणीत वाढ झाली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विमानतळाच्या सुरक्षेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे.

प्रत्येकाची तपासणी केली जात असल्याने प्रवासी वैतागली आहेत. प्रत्येकाच्या सामानाची दोन-दोन वेळा तपासणी केली जात आहे. राधा सिंह नावाच्या एका प्रवासी महिलेला सीआयएसएफच्या जवानांनी दागिने काढण्यास सांगितले. त्यांच्या बॅगही उघडण्यास सांगितल्याचे वृत्त हिंदूस्तान टाइम्सने दिले आहे.
बोर्डिंगच्या ठिकाणीही बॅगांची तपासणी करण्याचे आदेश सीआयएसएफने दिले आहेत. सीआयएसएफचे संचालक जनरल ओ. पी. सिंह म्हणाले, विमानतळाच्या दिशेने येणाऱ्या सर्व रस्त्यांवरील सुरक्षा वाढवली आहे. वाहनांचा वेग कमी राहावा म्हणून आवश्यक तिथे अडथळेही उभा केले आहेत. विमानात जाण्यापूर्वी प्रवाशांची पुन्हा एकदा तपासणी करण्याच्या सूचना विमान कंपन्यांना दिल्या आहेत. प्रवाशांनीही आपल्या वेळेपूर्वी येण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जेव्हा जास्त धोका असतो तेव्हा दोन टप्प्यात तपासणी केली जाते. त्यामुळे प्रवाशांनाही अनेक सुरक्षाचक्रातून जावे लागत आहे. सध्या अमेरिकेत जाणाऱ्या काही मोजक्या विमान कंपन्याकडूनच अशाप्रकारे प्रवाशांची तपासणी केली जाते.