बिहारमधील सीतामढी येथील न्यायालयात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याविरोधात शबरीमला मंदिर प्रवेशाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी देशद्रोहाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाह यांनी २७ ऑक्टोबरला केरळ येथील कन्नूर येथे झालेल्या सभेत न्यायालयाविरोधात भाष्य केले होते. लोकांच्या धार्मिक आस्थेविरोधात आणि जे लागू करता येत नाहीत, असे निर्णय न्यायालयाने घेऊ नये, असे म्हटले होते. शबरीमला मंदिर प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाकडे त्यांचा इशारा होता.

सामाजिक कार्यकर्ता ठाकूर चंदनसिंह यांनी अमित शाह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी येत्या ६ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होईल. शाह यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आव्हान देऊन लोकांच्या भावनेला ठेच पोहोचवली आहेच, शिवाय देशाच्या संघीय आणि लोकशाही व्यवस्थेवर हल्ला केला आहे, असे ठाकूर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

आगामी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राजकीय फायदा घेण्यासाठी शाह यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. कन्नूर येथे पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आल्यानंतर अमित शाह यांनी केरळमधील डाव्या आघाडीच्या सरकारवर टीका करत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरही प्रश्न उपस्थित केले होते.