समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यासमोरील अडचणीत वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय सैन्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी बिजनौर येथील चांदपूर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आझम खान यांच्या या वक्तव्यानंतर अनेक नेत्यांनी व संघटनांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

आझम खान यांच्याविरोधात भारतीय दंडविधान नुसार कलम १२४ अ (राजद्रोह), १३१ (दंगल घडवण्यासाठी प्रोत्साहन देणे किंवा कर्तव्यावर असलेल्या सैनिकाला विचलित करण्याचा प्रयत्न करणे) आणि कलम ५०५ (आपल्या वक्तव्याने शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणे) या अंतर्गत प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आल्याची माहिती, पोलीस ठाण्याचे प्रभारी अजय कुमार सिंह यांनी दिली. हा गुन्हा बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचे प्रांत मंत्री अनिल पांडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दाखल करण्यात आला आहे.

…म्हणून सैन्याच्या जवानांचे गुप्तांग कापले: आझम खान बरळले

या कलमाअंतर्गंत आझम खान यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध झाल्यास त्यांना आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते. कलम १२४ अ आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांना विचलित करण्याच्या कलम १३१ या दोन्हीमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा होऊ शकते.

गेल्या आठवड्यात आझम खान यांनी सेना आणि भारतीय सुरक्षादलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. दहशतवादी जवानांचे गुप्तांग कापून नेले. त्यांना जवानांच्या हात, डोक किंवा पायावर आक्षेप नव्हता. त्यांना शरीराच्या ज्या भागावर आक्षेप होता तोच भाग त्यांनी कापून नेला. या घटनेमुळे संपूर्ण देशाची नाचक्की झाली असून आपण जगाला काय तोंड दाखवणार आहोत असा सवाल त्यांनी विचारला होता. हे सर्व एका कॅमेऱ्यात कैद झाले होते.