येत्या दोन महिन्यांत मोबाइल सिम कार्ड आधार कार्डच्या क्रमांकाशी जोडण्यास सुरुवात करेल. या योजनेचा अतिरिक्त लाभ त्या मोबाइलधारकाला होईल, असे एका वरिष्ठ सराकारी अधिकाऱ्याने सांगितले. विशेष करून आर्थिक व्यवहार करताना मोबाइलधारकाला ते अधिक सोयीस्कर होणार आहे.
अर्थात ही प्रक्रिया प्रत्येकाला बंधनकारक करण्याचा सरकारचा सध्या तरी विचार नाही. मात्र त्यासाठीची योग्य पाश्र्वभूमी तयार झाल्यास अधिकाधिक लोकांना यात सामील करून घेता येईल. सरकारच्या वतीने देण्यात येणारी अनुदानांचा गैरवापर टाळण्यासाठी ही योजना अत्यंत उपयोगी ठरेल. याशिवाय दहशतवाद, खंडणीसारखे गुन्हे रोखण्यासाठी तसेच मोबाइलवरील आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्यासाठीही याचा फायदा होईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
जिथे जिथे मोबाइल सिम आधार कार्डशी जोडण्यात येईल त्या वेळेपासून आधारकार्डधारक सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये सहभागी होऊ शकतील. एकदा का ही योजना कार्यान्वित झाली, तर बोटांच्या ठसे देणेही अधिक सोयीस्कर होणार आहे. त्यानंतर नागरिक आर्थिक व्यवहार करू शकतील. ही योजना बंधनकारक नाही, पण पाश्र्वभूमी तयार करण्यासाठी हा प्रयोग सर्वोत्तम ठरेल, असे माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे सचिव आर. एस. शर्मा यांनी सांगितले. ‘नॅसकॉम’च्या वतीने घेण्यात आलेल्या एका सोहळ्यानंतर पत्रकारांशी झालेल्या चर्चेत ते बोलत होते.
केंद्र सरकारकडून प्रतिपादन कुठेही कधीही आणि कसेही..
केंद्रातील याआधीच्या संयुक्त पुरोगामी सरकारने आधार कार्ड बँक खात्याशी जोडण्याचा निर्णय घेतला होता. तसे केल्यास गॅसवर मिळणारे अनुदान, तसेच इतर सरकारी अनुदाने बँक खात्यात जमा होण्यास सोयीचे होईल, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर यूपीए सरकारच्या काळात केंद्रीय गृहमंत्रालयाने आधार कार्ड हा ओळखीचा पुरावा मानू नये, असे स्पष्ट केले. परंतु ओळखीसाठीचा आधार कार्ड हा एकमेव स्रोत असल्याची भूमिका मोदी सरकारने मांडली. आधार कार्ड पुरावा म्हणून कुठेही, कधीही आणि कसेही पडताळून पाहता येईल, असे स्पष्ट केले.
गुन्हेगारीविरोधातही ‘आधार’
सरकारने आधारकार्ड तुमच्या मोबाईल फोनच्या सिमकार्डला जोडणे अनिवार्य करण्याचे ठरवले असून त्यामुळे सीमकार्डचा वापर कुणी अनाहूत व्यक्ती करीत असेल तर ती पकडली जाईल. तसेच दहशतवादी कारवाया, खंडण्या गोळा करणे व इतर गुन्ह्य़ांना आळा बसेल.
सूत्रांनी सांगितले की, सरकारने आधार कार्ड हे सिमकार्डला जोडण्याचे ठरवले असून त्यामुळे मोबाईलचा वापर दहशतवाद व खंडणीसारख्या कृत्यांसाठी केल्यास ते उघड होणार आहे.
आधार योजनेचा नुकताच आढावा घेण्यात आला; त्यात मोबाईल जुना असो की नवीन त्याला आधारकार्ड जोडण्याची कल्पना मांडण्यात आली आहे. यापूर्वी गृहमंत्रालयाने आधारकार्ड हे ओळखपत्र म्हणून वापरण्याबाबत शंका उपस्थित केल्या होत्या. पण आता आधारकार्डचे महत्त्व वाढले आहे. त्याच्या मदतीने ती व्यक्ती तीच आहे हे पटवून देता येऊ शकेल. आधारकार्डावर प्रत्येकाचा क्रमांक वेगळा असल्याने ते त्या व्यक्तीची ओळख ठरू शकते. आधारकार्डामुळे गरजू व्यक्तींना बँकिंग व इतर सुविधाही मिळू शकतात. आधारकार्ड मोबाईल सिमकार्डला जोडण्याची योजना धिमेपणाने राबवली जाणार आहे, कारण अजून सर्व लोकांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर मिळालेला नाही.