देशामध्ये दरवर्षी साधारणत: चाळीस कोटी रुपये किमतीच्या ८ ते ९ लाख बनावट नोटा पकडल्या जात असल्याची माहिती शुक्रवारी लोकसभेमध्ये देण्यात आली. याउलट एका अभ्यासानुसार, दरवर्षी देशामध्ये सुमारे सत्तर कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा घुसविल्या जातात.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी मंडळाच्या हवाल्याने अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बनावट नोटांचा तपशील दिला. त्यानुसार २०१३ मध्ये ८ लाख ४६ हजार ९६६ नोटा पकडल्या. त्यांची एकूण किंमत ४२.९० कोटी रुपये होते. २०१४ मध्ये ४०.५८ कोटी किमतीच्या ८ लाख १ हजार ५२८ बनावट नोटा हस्तगत केल्या. २०१५ मध्ये हेच प्रमाण ४३.८३ कोटींवर पोहोचले. सापडलेल्या नोटांची संख्या होती एकूण ८ लाख ८६ हजार ५८. चालू वर्षी ३० सप्टेंबपर्यंत ५ लाख ७४ हजार १७६ नोटा सापडल्या असून त्याची किंमत २७.७९ कोटी रुपये आहे.

हेरगिरी, दहशतवादी कारवाया, शस्त्रास्त्रे, अमली पदार्थ आणि सोन्याच्या तस्करीमार्फत बनावट नोटा भारतामध्ये ओतल्या जात असल्याची माहिती जेटलींनी दिली.

मागील संसद अधिवेशनामध्ये दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशामध्ये चारशे कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा आहेत. हा अंदाज कोलकात्यातील भारतीय सांख्यिकी संस्थेच्या अभ्यासातून निघाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी कारवायांसाठी दरवर्षी सुमारे सातशे ते आठशे कोटींचा वित्तपुरवठा होतो. त्यांपैकी तीनशे ते चारशे कोटींचा हिस्सा नक्षलवाद्यांचा आहे.

पाच व दहा रुपयांचेही बनावट नाणे

केवळ नोटाच नव्हे, तर पाच आणि दहा रुपयांचे बनावट नाणेही असल्याची माहिती सरकारने दिली. अशी बनावट नाणी तयार करणाऱ्या दिल्लीतील तीन टांकसाळीवर मध्यंतरी छापे घातल्याचेही जेटलींनी सांगितले. नाण्यातील धातूंच्या मिश्रणावरून ते खरे किंवा बनावट ओळखले जाते.