विद्यापीठांच्या प्रवेश प्रक्रियेत गुणपत्रिका, जन्मदाखला आदी महत्त्वाच्या कागदपत्रांवर आजवर अनिवार्य समजली जाणारी सक्षम अधिकाऱ्याची सही (अ‍ॅटेस्टेशन) आता इतिहासजमा होणार असून या कागदपत्रांवर अर्जदाराची स्वत:ची सहीच यापुढे चालणार आहे.
गुणपत्रिका, जन्मदाखला तसेच प्रवेश प्रक्रियेसाठी लागणाऱ्या अन्य कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींवर ती मूळ कागदपत्राची नक्कल आहे याची मी खातरजमा केली आहे, अशा आशयाची सक्षम अथवा राजपत्रित अधिकाऱ्याची सही असणे आजवर बंधनकारक होते. त्यामुळे अशा सक्षम अधिकाऱ्याचा शोध घेऊन या नकला सह्य़ांकित करून घेणे हे प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मोठे आव्हान असते. मात्र अशा प्रकारे कागदपत्रे सह्य़ांकित करून घेण्याच्या पद्धतीला फाटा द्यावा, असा फतवा आता विद्यापीठ अनुदान आयोगाने काढला आहे. विशेष म्हणजे या आदेशाची अंमलबजावणी देशभरातील सर्व विद्यापीठांनी येत्या एका आठवडय़ात करायची आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने २६ सप्टेंबर रोजी सर्व विद्यापीठांना हा आदेश पाठवला आहे. अ‍ॅटेस्टेशनची प्रक्रिया रद्द करून स्वसह्य़ांकित कागदपत्रांची पद्धती तातडीने अमलात आणावी आणि त्यासंदर्भातील अहवाल आठवडाभरात आयोगाकडे पाठवावा, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे देशभरातील सर्वच महाविद्यालयीन युवकांना फायदा होणार आहे. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना त्याचा अधिकच लाभ होणार आहे. आपल्या कागदपत्रांवर सह्य़ा करण्यासाठी राजपत्रित अथवा सक्षम अधिकारी शोधणे ही ग्रामीण विद्यार्थ्यांसमोर मोठीच अडचण असते.