News Flash

झुंडहत्येबाबत कार्यवाही अहवाल मागवला

या संदर्भात काँग्रेसनेते तहसीन पूनावाला यांनी याचिका दाखल केली होती.

गोरक्षेच्या नावाखालील झुंडहत्या रोखण्यासाठी दिलेल्या आदेशाबाबतचा कार्यवाही अहवाल आठवडाभरात दाखल करण्याचा आदेश शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना दिला. त्यात अपयशी ठरणाऱ्या राज्यांच्या गृह सचिवांना न्यायालयात हजर राहावे लागेल, असा इशाराही न्यायालयाने दिला.

झुंडहत्यांबाबतचा हा अहवाल तीन आठवडय़ांत देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी दिला होता. आतापर्यंत ११ राज्ये आणि सात केंद्रशासित प्रदेशांनी आपले अहवाल सादर केले आहेत.

या संदर्भात काँग्रेसनेते तहसीन पूनावाला यांनी याचिका दाखल केली होती. राजस्थानचे मुख्य सचिव, इतर अधिकारी आणि पोलीस प्रमुखांवर न्यायालयीन अवमानाचा खटला भरावा. गोपालक शेतकरी रकबर खान याचा २० जुलैला जमावाने ठेचून मारल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतरही न्यायालयाच्या आदेशानुसार राजस्थानने कुठलीही कारवाई केली नाही, असे पूनावाला यांनी निदर्शनास आणले होते.

गोरक्षेच्या नावाखाली होणाऱ्या हिंसाचाराबाबत मंत्र्यांचा सक्षम गट स्थापन करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या प्रतिबंधासाठी कायदा करण्याची पूर्वतयारी हा गट करीत आहे, असे याचिकेच्या सुनावणीच्या वेळी केंद्र सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.

पोलीस अधीक्षक दर्जाचा अधिकारी आणि त्याला मदतनीस म्हणून उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी जिल्हा पातळीवर नेमावा. हे दोन अधिकारी एक विशेष दल तयार करून असे गुन्हे घडण्याची शक्यता असल्याबाबतची गुप्त माहिती गोळा करतील. अफवा पसरवणारे, प्रक्षोभक आणि द्वेषमूलक भाषणे करणारे यांच्याबाबतची माहितीही या अधिकाऱ्यांनी जमा करावी, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले होते.

गेल्या पाच वर्षांत जेथे जमावाचा हिंसाचार आणि जमावाने ठेचून मारण्याचे गुन्हे घडले आहेत, अशी ठिकाणे शोधण्यासाठी न्यायालयाने राज्यांना तीन आठवडय़ांचा अवधी दिला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2018 12:28 am

Web Title: self styled cow defense supreme court of india
Next Stories
1 भारत, पाकिस्तानातील काही हितसंबंधींना काश्मीरमध्ये शांतता नको
2 पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत यायला हवे; धर्मेंद्र प्रधान यांचा भाजपाला घरचा आहेर
3 हार्दिकचे बरेवाईट झाल्यास मोदी-शाहंना चहा-पकोडे विकायला भाग पाडू : राजू शेट्टी
Just Now!
X