जगात चालू वर्षात शार्क माशांच्या हल्ल्यापेक्षा सेल्फी घेण्याच्या नादात जास्त मृत्यू झाले असल्याचे एका माध्यमसंस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आढळले.
चालू वर्षात जगात शार्क हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आठ इतकी आहे. तर सेल्फी काढताना झालेल्या दुर्घटनेमुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा १२ वर गेला आहे.
नुकतेच ताज महल येथे सेल्फी काढण्याच्या नादात एका ६६ वर्षांच्या व्यक्तीचा जिन्यावरून पडून मृत्यू झाला होता. तर त्याच्यासोबत असलेला व्यक्ती या अपघातात जखमी झाला होता. वर्षभरात एकूण चार जणांचा सेल्फी घेताना पडून मृत्यू झाल्याचे दिसले. या व्यतिरिक्त सेल्फी घेताना रेल्वेची धडक बसल्यामुळे किंवा रेल्वेखाली सापडल्यामुळेही मृत्यू झाले आहेत. रेल्वेसोबत सेल्फी काढताना असे अपघात झाले असल्याचे दिसले.
या महिन्याच्या सुरुवातीला एका १९ वर्षीय तरुणाचा सेल्फी घेताना गोळी लागून मृत्यू झाला होता. बंदुकीसोबत सेल्फी काढत असताना चुकून बंदुकीचा खटका दाबला गेल्याने तरुणाला गोळी लागली आणि तो मृत पावला होता.