सरबजितसिंगला अधिक चांगल्या उपचारांसाठी तातडीने परदेशात हलवावे, अशी मागणी बुधवारी परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे केली. लाहोरमधील जिना रुग्णालयात सरबजितसिंगवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर मोहमद शौकत यांनी सांगितले आहे.
सरबजितचे आयुष्य वाचविण्यासाठी आवश्यक पावले टाकताना कायदेशीर आणि प्रशासकीय अडचणींचा विचार करण्याची ही वेळ नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानकडे स्पष्ट केले. मानवतेच्या दृष्टीने विचार करून सरबजितची लगेचच सुटका करावी, असेही भारताने याअगोदरच पाकिस्तानला सांगितले आहे.
दरम्यान, केंद्र सरकार सरबजितवर चांगले उपचार करण्यासाठी फारसे प्रयत्न करीत नसल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्याचे कुटुंबिय दिल्लीला जाऊन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह इतर महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहे. यासंदर्भात पाकिस्तानवर दबाव टाकण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे.