कोट लखपत तुरुंगातील कैद्यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरबजित सिंगला (४९) उपचारासाठी भारतात पाठवावे, अशी विनंती त्याच्या पत्नीने रविवारी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना केली. दरम्यान, सरबजितला भेटण्यावर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांवर र्निबध लादले आहेत. हे र्निबध मागे घेण्याची मागणी भारताने केली आहे.
सरबजितची पत्नी सुखप्रीत, त्यांच्या कन्या स्वपनदीप व पूनम, तसेच बहीण दलबीर कौर हे सर्व जण रविवारी दुपारी वाघा सीमा ओलांडून पाकिस्तानात दाखल झाले. सरबजितची पत्नी सुखप्रीत कौर यांनी सांगितले, ‘‘सरबजितला जिना रुग्णालयात योग्य उपचार मिळत नसल्याचे आम्हाला समजले आहे. जर माझ्या पतीला उपचारासाठी भारतात पाठवले तर बरे होईल.’’
 सरबजितचे वकील अवैस शेख व नागरी समुदाय गटांच्या सदस्यांनी वाघा सीमेवर सरबजितच्या कुटुंबीयांचे स्वागत केले. सुखप्रीत यांनी सांगितले, की सरबजितचा जीव वाचणे हे आम्हाला महत्त्वाचे वाटते. त्यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर पाकिस्तान सरकारने कठोर कारवाई करावी.
सरबजितची बहीण दलबीर कौर म्हणाल्या, ‘‘अतिशय दु:खद परिस्थितीत आम्ही पाकिस्तानला भेट देत आहोत. गंभीर जखमी असलेल्या बंधूला भेटायला येथे आलो असून, तो कोमात असल्याचे सांगण्यात आले आहे. कोटय़वधी भारतीयांच्या सदिच्छांसह आपण सुवर्णमंदिरातील प्रसाद भावाला देणार आहोत.’’ या वेळी अश्रू लपवणे दलबीर यांना कठीण जात होते. पाकिस्तान सरकारने आमच्यापैकी एकाला सरबजितजवळ राहण्यास परवानगी दिली आहे व आपण त्याच्याजवळ राहणार आहोत. सरबजितची कन्या पूनम हिने सांगितले, की आपण एकदाच वडिलांना तुरुंगात भेटलो आहोत. वडिलांना पहिल्यांदा पाहिले तेव्हा मोठा आनंद झाला व त्यांना आता रुग्णालयात ठेवण्यात आले आहे ही दु:खद घटना आहे. वडिलांच्या प्रकृतीसाठी आपण परमेश्वरापाशी प्रार्थना करत आहोत.
सरबजितचे कुटुंबीय पंधरा दिवस पाकिस्तानात राहणार आहे. नानकाना साहिब या गुरू नानक यांच्या जन्मगावी जाऊन ते सरबजितच्या प्रकृतीस आराम पडावा यासाठी प्रार्थना करणार आहेत. परराष्ट्र सचिव रंजन मथाई यांनी भारतीय दूतावासाला सरबजितच्या कुटुंबीयांसाठी लाहोरमध्ये व्यवस्था करण्यास सांगितले आहे.
भेटीवर राजनैतिक र्निबध
सरबजितला भेटण्यावर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांवर र्निबध लादले आहेत. त्यामुळे भारताने आता त्याला नियमित भेटू देण्याचे आवाहन पाकिस्तानला केले आहे. हल्ल्याच्या घटनेनंतर सरबजितला भेटण्याची संधी भारतीय दूतावासाच्या दोघा अधिकाऱ्यांना एकदाच म्हणजे शनिवारी देण्यात आली होती. नंतर त्याची भेट घेऊ देण्यात आली नाही, असे भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने सांगितले. सरबजितला नियमित भेटण्याची राजनैतिक परवानगी द्यावी, अशी भारताची मागणी आहे. याबाबत पाकिस्तानी अधिकाऱ्यांशी चर्चेची प्रक्रिया सुरू आहे.
सरबजितसिंग वाचण्याची शक्यता फारच कमी?
सरबजितसिंग हा अजूनही कोमामध्येच असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होण्याची काहीही चिन्हे नाहीत. तो वाचण्याची शक्यता फारच कमी असल्याचे मत त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी व्यक्त केले आहे. डॉक्टरांच्या या अंदाजामुळे सरबजित आता जीवनमृत्यूच्या निर्णायक लढाईत जिंकणार की हरणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. सरबजितवर याला रुग्णालयात दाखल करून आता दोन दिवसांहून अधिक कालावधी उलटला असला तरी त्याच्या प्रकृतीमध्ये कसलीही सुधारणा झालेली नाही. त्याच्या डोक्याला मोठय़ा प्रमाणावर जखमा झाल्या असून त्याच्यावर त्यामुळे शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे परंतु बेशुद्धावस्थेत असल्यामुळे ती बाब डॉक्टरांसाठी अत्यंत कठीण ठरली आहे. डॉक्टरांनी रविवारी सरबजितच्या प्रकृतीची तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया करणे शक्य नाही, या निष्कर्षांवर ते आले. ‘ग्लासगो कोमा स्केल’ च्या दंडकांनुसार सरबजितची प्रकृती पाचच्या पातळीवर आहे. ही पातळी एखाद्या व्यक्तीच्या मध्यवर्ती मज्जारज्जूंच्या यंत्रणेच्या हानीची पातळी दर्शविते.