नवी दिल्ली: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी रविवारी पेगॅसस पाळत वादावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. पेगॅससद्वारे हेरगिरी झाली की नाही, याबाबत पंतप्रधानांनी संसदेत निवेदन करून सरकारची बाजू स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. याप्रकरणी केंद्र सरकारने एकतर संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशीचा निर्णय घ्यावा, किंवा चौकशीसाठी विद्यमान न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती करावी, असे चिदंबरम म्हणाले. २०१९ मधील सार्वत्रिक निवडणुकीत झालेल्या मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेत अशा बेकायदा तंत्रज्ञानाने हस्तक्षेप झाला असावा काय, अशी सरसकट शंका उपस्थित करता येणार नाही, पण यातून भाजपला विजयी होण्यात मदत झालेली असू शकते, तसे आरोपही झाले आहेत, याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले.