जम्मूतील शांती संमेलनात ज्येष्ठ नेत्यांची स्पष्टोक्ती

गुलाम नबी आझाद यांच्या अनुभवाचा पक्षाने लाभ घेतला नसल्याचीही तक्रार

काँग्रेस गेल्या दशकात अधिक दुबळी झाली असून नव्या पिढीतील नेत्यांशी पक्षाची नाळ जोडली जाईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत ‘जी-२३’मधील काही नेत्यांनी जम्मू येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या  कार्यक्रमात व्यक्त केले.

‘‘काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना संसदेतून निवृत्त करण्याचा निर्णय पक्षाने घेतला, त्यामुळे आपल्याला वेदना झाल्या. काँग्रेस पक्षाने आझाद यांंच्या अनुभवाचा अधिक चांगला फायदा करून घ्यावयास हवा होता’’, अशी भावना यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केली. गेल्या वर्षी काँग्रेसच्या २३ बंडखोर नेत्यांनी (जी-२३ नेते) काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना खुले पत्र पाठवून पक्षाच्या कारभारावर जोरदार टीका केली होती.

तळागाळातील कार्यकत्र्यांशी पुन्हा नाळ जोडण्यासाठी ‘शांती सम्मेलन’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्या वेळी सिब्बल बोलत होते. प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची स्थिती काय आहे याची आझाद यांना चांगलीच जाण आहे. त्यांना संसदेतून मुक्त करण्यात येत असल्याची आम्हाला जाणीव झाली तेव्हा आम्हाला वेदना झाल्या. त्यांनी संसदेतून जाऊ नये असे आम्हाला वाटत होते, काँग्रेस त्यांच्या अनुभवाचा फायदा का करून घेत नाही ते कळत नाही, असे सिब्बल म्हणाले.

आनंद शर्मा सहमत

कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद यांच्यासह मनीष तिवारी, आनंद शर्मा, भूपिंदर हुडा आणि राज बब्बर हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. जम्मू-काश्मीरचा एकही प्रतिनिधी राज्यसभेत नसल्याचे १९५० पासून प्रथमच घडले आहे, त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आनंद शर्मा म्हणाले. काँग्रेस पक्ष दुर्बल झाल्याचे मत सिब्बल यांनी व्यक्त केले, त्याच्याशी शर्मा यांनी सहमती दर्शविली.

काँग्रेस पक्षाला सध्या भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण आणि आपले सहकारी जम्मूत एकत्र आले आहेत. काँग्रेस पक्ष दुर्बल होत चालला आहे हे सत्य आम्हाला दिसत आहे आणि म्हणूनच आम्ही येथे एकत्र आलो आहोत, यापूर्वीही आम्ही एकत्र आलो होतो आणि आम्हाला एकत्रितपणे पक्ष मजबूत करावयाचा आहे. -कपिल सिब्बल, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते