तेलगंणातील सामाजिक कार्यकर्त्या पद्मिनी रेड्डी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. पद्मिनी रेड्डी यांचे पती सी दामोदर राजा नरसिम्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. गुरुवारी ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. आंध्र प्रदेशचं विभाजन होण्याआधी राजा नरसिम्हा काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री होते. त्यावेळी एन कुमार रेड्डी मुख्यमंत्रीपदी होते.

भाजपा प्रदेशाध्यक्ष के लक्ष्मण यांनी पद्मिनी रेड्डी यांचं स्वागत केलं आहे. पद्मिनी रेड्डी यांनी सामाजिक क्षेत्रात उत्तम कार्य केलं असून महिलांमध्येही आपली ओळख निर्माण केली आहे. पुढे बोलताना त्यांनी मोदी सरकारने महिलांना संधी दिल्याचं नमूद केलं. ‘मोदी सरकारने निर्मला सीतारमण यांना केद्रीय संरक्षणमंत्रीपद दिलं असून, अजून एका महिला नेत्या सुमित्रा महाजन यांना लोकसभा अध्यक्ष केलं आहे’.

एनडीए सरकारने चांगलं काम केलं असून त्याची दखल घेत पद्मिनी रेड्डी यांनी भाजपा पक्षात प्रवेश केला असल्याचं भाजपा प्रदेशाध्यक्ष के लक्ष्मण यांनी सांगितलं आहे. पुढे बोलताना त्यांनी, ‘एनडीए सरकारने महिलांच्या सबलीकरणासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. यामध्ये सुकन्या समृद्धी योजना तसंच बाळंतपणाची रजा वाढवून दिली आहे’.पद्मिनी रेड्डी यांच्या भाजपा प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

पद्मिनी रेड्डी यांचे पती काँग्रेसमध्ये असताना त्या भाजपात प्रवेश का करत आहेत असं विचारलं असता राजकारणात प्रत्येकाला आपलं वैयक्तिक स्वातंत्र्य असतं असं त्यांनी सांगितलं.