वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड करण्यात आली आहे. खरोला हे कर्नाटक कॅडरचे असून सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते.

रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर ऑगस्टमध्ये एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या प्रमुखपदी निवड झाली होती. यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव बन्सल यांची तीन महिन्यांसाठी एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली होती. बन्सल यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे या पदावर कोणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मंगळवारी सरकारने कर्नाटक कॅडरच्या प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली. एअर इंडियांवर सुमारे ५० हजार कोटींचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली सुरु आहेत. त्यामुळे खरोला यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.