तिरुअनंतपूरम : केरळच्या ‘आयर्न लेडी’ अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मंत्री के. आर. गौरी अम्मा यांचे मंगळवारी  खासगी रुग्णालयात  निधन झाले. त्या १०२ वर्षांच्या होत्या.  साम्यवादी चळवळीत अग्रणी असलेल्या गौरी अम्मा या केरळ राज्याच्या पहिल्या मंत्रिमंडळातील एकमेव महिला मंत्री होत्या. केरळमधील क्रांतिकारी असे भूमी सुधारणा विधेयक मंजूर करण्याच्या मोहिमेत त्या अग्रस्थानी होत्या.

जनाधिपत्य समरक्षण समितीच्या  प्रमुख असलेल्या गौरी यांच्यावर  अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.  ईएमएस. नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखालील केरळच्या पहिल्या विधानसभेतील हयात असलेल्या त्या एकमेव सदस्या होत्या. कम्युनिस्ट पक्षात १९६४ मध्ये फूट पडल्यानंतर गौरी अम्मा यांनी माकपमध्ये प्रवेश केला, तर त्यांचे पती टी. व्ही. थॉमस हे भाकपमध्येच राहिले. अलापुझ्झा जिल्ह्यातील पट्टनक्कड गावात १४ जुलै १९१९ रोजी त्यांचा जन्म झाला.  ए. के. अ‍ॅण्टनी आणि ओम्मन चंडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी २००१ ते २००६ पर्यंत काम केले होते.

गौरी अम्मा यांच्याकडे १९८७ च्या निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून पाहिले जात होते, मात्र माकपने त्यांना डावलून ई. के. नयनार यांची निवड केली होती. त्यांची १९९४ मध्ये माकपमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी जेएसएसची स्थापना केली होती.