जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) हिंसाचारप्रकरणी विद्यापीठातील वसतिगृहाच्या वरिष्ठ वॉर्डन आर. मीना यांनी राजीनामा दिला आहे. विद्यार्थ्यांना सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी आमच्यावर होती. मात्र, आम्ही सुरक्षा पुरवू शकलो नाही, असे सांगत त्यांनी याची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला आहे.

आर. मीना या जेएनयूतील साबरमती वसतिगृहाच्या वरिष्ठ वॉर्डन आहेत. त्यांनी विद्यापीठातील हिंसाचाराविरोधात राजीनामा दिला आहे. दरम्यान, जेएनयू हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. तर या हिंसाचारात जखमी झालेल्या २३ विद्यार्थ्यांना उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जेएनयू हिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांकडे तीन तक्रारी आल्या होत्या. या तक्रारींवरुन या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांच्या पोलीस सहआयुक्त शालिनी सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाची चौकशी करणार आहे. या पथकात ४ पोलीस निरिक्षक आणि दोन अतिरिक्त पोलीस आयुक्तांचा समावेश असणार आहे.

याप्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांच्याशी चर्चा केली. शाह यांनी नायब राज्यपालांना जेएनयूच्या प्रतिनिधींना बोलावून त्यांच्याशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे दिल्लीचे (दक्षिण-पश्चिम) डीसीपी देवेंद्र आचार्य यांनी सांगितले की, “विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराची आम्ही दखल घेतली असून एक एफआयआर दाखल केली आहे. तसेच सोशल मीडिया आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे.”

जेएनयूचे कुलगुरु एम. जगदीश कुमार यांनी सर्व विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले, “विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थ्यांनी अॅकॅडमिक कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी सर्व सुविधा कायम उपलब्ध करुन दिल्या जातील. विद्यार्थ्यांनी परीक्षांच्या नोंदणीसाठी कुठलीही अडचण येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे त्यांनी या प्रक्रियेला घाबरण्याचे कारण नाही. विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे.