शेअर बाजाराने सलग दुसऱ्या दिवशी इतिहास रचला आहे. आज (गुरूवार) सकाळी शेअर बाजार सुरू होताच सुमारे ४०० अंकाची उसळी घेत सेन्सेक्स आपल्या सर्वोच्च स्थानी म्हणजे ३५.४६६ वर पोहोचला. बुधवारी ३५ हजारांची उसळी घेणाऱ्या सेन्सेक्सने आपला धडाका आजही कायम ठेवला. निफ्टीनेही शानदार तेजी दाखवत १०८७० अंकाचा आकडा पार केला.

गुरूवारी मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स ३५.४५० ला सुरू झाला आणि पाहता पाहता ३५० अंकाने तो मजबूत झाला. तिकडे बँकिंग शेअर्समधील तिहेरी शतकाच्या जोरावर निफ्टी पण १०.८७३ अंकावर सुरू झाला. ९.३३ वाजता बँक निफ्टीने ५०० अंकाची उसळी घेतली. मिडकॅप इंडेक्समध्येही १४० पॉईंटची उसळी दिसून आली.

गुरूवारी सुरूवातीच्या व्यवहारात ज्युबिलंट फूड्स, एचयूएल, वोकहार्ट, माइंडट्री, जेट एअरवेज, सियेंट, तिरुमलाई, मास्टेक, अदानी ट्रान्समिशन, यस बँक, एचडीएफसी बँक आदी शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर इन्फोसिस, बर्जर पेंट्स, वेस्ट कॉस्ट, भारती इन्फ्राटेल, आरकॉमसारख्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. अजूनही निफ्टीमध्ये तेजी दिसून येत आहे.

दरम्यान, तिजोरीवर भार ठरणाऱ्या अतिरिक्त कर्ज उभारणीला सरकारने लावलेल्या कात्रीने भांडवली बाजाराला बुधवारी उत्साहाचे भरते आले. देशातील दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी यामुळे त्यांच्या अनोख्या टप्प्याला गवसणी घातली. असे करताना सेन्सेक्स प्रथमच ३५ हजारांपुढे गेला, तर निफ्टीने इतिहासात प्रथमच त्याच्या १०,८०० नजीकच्या टप्प्याला गवसणी घातली.

केंद्र सरकारने अतिरिक्त कर्ज उभारणीसाठीची आधीची ५०,००० कोटी रुपयांची रक्कम बुधवारी २०,००० कोटी रुपयांवर आणून ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे वाढत्या वित्तीय तुटीबाबत काहीसा दिलासा मिळाला आहे. याचे सकारात्मक पडसाद मुंबई निर्देशांकात एकाच व्यवहारात ३११ अंशांची भर नोंदविण्याच्या रूपात पडले.

देशातील सर्वात जुन्या मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकाचे ३५ हजारी यश बुधवारी भांडवली बाजाराचे सत्र व्यवहार संपुष्टात आल्यानंतर ‘दलाल स्ट्रीट’ येथे केक कापून तसेच फुगे उडवून साजरे करण्यात आले. २६ डिसेंबर २०१७ रोजीचा ३४,०००चा सेन्सेक्सचा प्रवास १७ व्यवहारांमध्ये १,००० अंशांपुढे गेला आहे. भांडवली बाजाराच्या निर्देशांक उसळीत माहिती तंत्रज्ञान कंपन्यांचे अधिक योगदान राहिले. तर जवळपास शतकी निर्देशांक वाढीने राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०,८०० नजीक पोहोचला. भांडवली बाजारात गेल्या सप्ताहापासून तेजीचे पर्व सुरू आहे.