तेलंगणविरोधी आंदोलनाने सीमांध्र प्रदेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून संचारबंदीचा आदेश धुडकावून शेकडो आंदोलक रस्त्यांवर उतरल्याने दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश विजयनगर शहर व जिल्ह्य़ातील इतर भागांत देण्यात आले आहेत. हिंसक घटनांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांसह १२ पोलीस जखमी झाले असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमकी झडत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने ३ ऑक्टोबरला स्वतंत्र तेलंगणाला  हिरवा कंदील दाखवल्यापासून आंदोलनाने जोर धरला आहे.
अग्रलेख : वारसाहक्कांची पोरखेळी लढाई

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बी. सत्यनारायण यांच्या तसेच त्यांच्या आप्तांच्या औद्योगिक आस्थापनांना जमावाने लक्ष्य केले असून दुकाने लुटणे, जाळपोळ, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान पाहता विजयनगरममध्ये संचारबंदी लागू आहे. मात्र सीमांध्र भागातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेने आंध्र प्रदेशात ४८ तासांचा बंद पुकारला आहे.  बी. सत्यनारायण यांच्या कुटुंबीयांकडून चालवल्या जाणाऱ्या सतना अभियांत्रिकी महाविद्यालयावर आंदोलकांनी हल्ला केला. याखेरीज त्यांच्या कुटुंबीयांच्या केबल नेटवर्कवरही हल्ला करण्यात आला. जिल्हा मध्यवर्ती बँक जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.