फुटीरतावादी खलिस्तानी गटांचे अमेरिकेतील प्राबल्य वाढले असून पाकिस्तान त्यांना फूस लावीत आहे, भारताने याबाबत अनेकदा आवाहन करूनही अमेरिकेने भारतविरोधी कारवाया रोखण्यात फारसे स्वारस्य दाखवले नाही, अशी टीका एका अहवालात करण्यात आली आहेत.

‘पाकिस्तान डिस्टॅबिलायझेशन प्लेबुक – खलिस्तानी अ‍ॅक्टीव्हिझम इन दी युएस’ या अहवालात हडसन इन्स्टिट्यूटने म्हटले आहे, की खलिस्तानी व काश्मिरी गटांच्या कारवायांचा आम्ही अभ्यास केला आहे. त्यात त्यांना पाकिस्तानचा पाठिंबा असल्याचे दिसून येत आहे. या गटांचे संबंध भारतातील व पाकिस्तानातील काही दहशतवादी संघटनांशी आहेत. त्याचा अमेरिकेच्या आग्नेय आशियातील परराष्ट्र धोरणावर विपरीत परिणाम होत आहे.

अहवालात म्हटले आहे, की पाकिस्तानातील इस्लामी गट व खलिस्तानी गट आता नव्या नावांनी उदयास येत आहेत. खलिस्तानवाद्यांच्या कारवायातून झालेल्या हिंसाचाराकडे अमेरिकी सरकारने दुर्लक्ष केले असून ब्रिटन, कॅनडा व अमेरिका या पाश्चात्त्य देशात खलिस्तानवादी समर्थक आहेत. खलिस्तानवादी दहशतवादाची अमेरिकेने दखल घेतली नाही तर त्याचे वेगळे परिणाम होऊ शकतात. पंजाबमधील हिंसाचारात सामील असलेले गट शोधून काढणेही कठीण होऊ शकते. हडसन संस्थेने म्हटले आहे, की राष्ट्रीय सुरक्षा नियोजनाच्या दृष्टिकोनातून उत्तर अमेरिकेतील खलिस्तानी गटांची चौकशी झाली पाहिजे. अन्यथा १९८० मध्ये जशी खलिस्तानवादी चळवळ उभी राहिली त्यासारखे काहीही घडू शकते.