जम्मू काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद अली शहा गिलानी यांनी सोमवारी हुर्रियत कॉन्फरन्सला सोडचिठ्ठी दिली आहे. २००३ मध्ये त्यांनी या संघटनेची स्थापना केली होती.

चार पानी पत्र व ध्वनी संदेशात त्यांच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, गिलानी हे हुर्रियत कॉन्फरन्सपासून आता दूर होत आहेत. त्यांनी याबाबत सर्व संबंधित घटकांना पत्र पाठवले असून त्यात हुर्रियत कॉन्फरन्स सोडण्यामागची कारणे स्पष्ट केली आहेत. या संघटनेचे ते आजीवन अध्यक्ष होते.

गिलानी यांनी म्हटले आहे की, हुर्रियत कॉन्फरन्स सदस्यांच्या पाकव्याप्त काश्मीरमधील कारवायांची चौकशी करण्यात येत आहे. त्यातील माहितीनुसार काही जणांनी पाकव्याप्त काश्मीरमधील विधानसभा व मंत्रालयांशी संधान बांधले आहे. काहींनी स्वत:च्या वेगळ्या बैठका सुरू केल्याने त्यांना काढून टाकण्यात आले आहे. त्यांच्या या कृतींना घटक संघटनांचे पाठबळ असल्याचेच दिसून येते. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेऊन दोन केंद्रशासित प्रदेश निर्माण केले तेव्हा आपण काही संदेश पाठवून पुढील कृती ठरवण्याचा प्रयत्न केला होता त्याला कुणीही प्रतिसाद दिला नाही. आता जबाबदारीची तलवार सर्वाच्या डोक्यावर आहे.

२००३ मध्ये मी स्वत: घटक पक्षांच्या आग्रहास्तव या संघटनेचे नेतृत्व स्वीकारले. नंतर आजीवन अध्यक्ष झालो, पण या संघटनेत शिस्त नाही अनेक उणिवा आहेत गेल्या अनेक वर्षांत जबाबदारीचे तत्त्व रुजलेले नाही. तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या आहेत व पक्षनेतृत्वाविरोधात बंड केले आहे.