भारतीय जवानांनी कंठस्नान घातलेल्या हिजबुल मुजाहिदीन या अतिरेकी संघटनेच्या दोघा अतिरेक्यांना जम्मू-काश्मीर राज्यातील फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी याने श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांचा ‘शहीद’ अशा शब्दांत गौरवही केला. ‘हे पवित्र रक्त वाया जाणार नाही’ असे विषारी फुत्कारही गिलानी याने सोडले. या वृत्ताचे पडसाद सामाजिक माध्यमांवर उमटले असून, सर्वच स्तरातून गिलानीच्या वक्तव्याचा कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला जात आहे.
२६ जानेवारी रोजी शौर्य पुरस्काराने गौरविण्यात आलेले कर्नल मुनिंद्रनाथ राय यांना हंडुरा गावात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत २७ जानेवारी रोजी वीरमरण आले. मात्र भारतीय लष्करानेही दोघा अतिरेक्यांचा खातमा केला. गिलानी याने या अतिरेक्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच ‘या अतिरेक्यांचे पवित्र रक्त वाया जाणार नाही’ अशी मुक्ताफळेही उधळली. भारतानेही वस्तुस्थिती स्वीकारण्याची तयारी दर्शवावी, अशी उद्दाम अपेक्षाही गिलानीने व्यक्त केली.
कंठस्नान घालण्यात आलेल्या दोघा दहशतवाद्यांपैकी एक अबीद खान याचे वडील जम्मू-काश्मीर पोलिसांमध्ये सेवेस आहेत. अबीद याचे मामाही दहशतवादीच होते, तर त्याच्या चुलतभावास गेल्यावर्षी पोलिसांवर हल्ला केल्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. काश्मिरी तरुणाने स्वीकारलेला हिंसेचा मार्ग हा त्यांचा छंदही नाही किंवा बेरोजगाराचा परिणामही नाही. तर येथील महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या तरुणांना काश्मीरच्या इतिहासाबद्दल पूर्ण कल्पना आहे, असे गिलानी म्हणाला.
काश्मिरी जनतेला भारत सरकारने दिलेले स्वयंनिर्णयाचे आश्वासन विस्मरणात गेल्यामुळे त्यांच्या मनात असंतोष खदखदत आहे. २००८ आणि २०१० मध्ये लहान मुलांसह अनेक जण रस्त्यावर उतरून झालेल्या दंगली हे त्या अंसतोषाचे प्रतीक होते, असा दावाही गिलानीने केला.
सरकारच्या आडमुठय़ा धोरणामुळेच राज्यातील तरुणाई लेखण्या आणि अभ्यासाचा मार्ग सोडून हिंसा आणि बंदुकांच्या वाटेला जात आहे. सरकारच्या धोरणामुळे काश्मीरमधील मौल्यवान युवकांना आपल्या जीवाचे मोल मोजावे लागत आहे. – गिलानी