काश्मीर खोऱ्यात शुक्रवारी फुटीरतावाद्यांनी पुकारलेल्या बंदमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. काश्मीर खोरे आणि संवेदनशील परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

सय्यद अली शाह गिलानी, मीरवाइज उमर फारूक आणि यासिन मलिक यांच्या अध्यक्षतेखालील फुटीरतावादी जेआरएलने गुरूवारी श्रीनगरमध्ये एका नागरिकाच्या हत्येविरोधात बंदचे आवाहन केले होते. प्रशासनाने मोहम्मद यासिन मलिकला अटक केली आहे. त्यांना श्रीनगरमधील कोठीबाग पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहे.

श्रीनगरमधील बहुतांश परिसरात आणि इतर ठिकाणी दुकाने, सार्वजनिक वाहने व इतर व्यापारी प्रतिष्ठाने आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. खासगी वाहतूक आणि तीन चाकी वाहन रस्त्यावर दिसून येत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्यामुळे सरकारी कार्यालये, बँक आणि पोस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी आहे. सध्यातरी अप्रिय घटना घडल्याचे वृत्त नाही.