फुटीरवाद्यांचा इन्सानियत, काश्मिरियत आणि जमुरियतवर विश्वास नाही. त्यांच्याकडे काश्मीर खोऱ्यातील शांततेविषयी चर्चा करण्यासाठी गेल्यानंतरही त्यांचा प्रतिसाद मिळत नाही, हे निराशाजनक आहे. जम्मू काश्मीरमधील परिस्थितीबाबत सरकार आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळ चिंतीत आहेत, अशी प्रतिक्रिया देत येथील चिघळलेली परिस्थिती सुधारण्याबाबत आम्हा सर्वांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पत्रकारांना दिली.
जम्मू काश्मीर समस्येबाबत शिष्टमंडळाच्या बैठकीतील मुद्यांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी हुरियत नेत्यांच्या भुमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांना हा प्रश्न सोडवायचा नसल्याचे त्यांनी निर्दशनास आणून दिले. शिष्टमंडळातील काही सदस्यांनी हुरियतच्या नेत्यांची भेट घेतली. पण ते यावर काहीच बोलत नाहीत. चर्चेसाठी आम्ही नेहमीच तयार आहोत, याचा पुनरूच्चार ही त्यांनी या वेळी केला.
जम्मू काश्मीर हा भारताचा भाग आहे. भाग होता आणि तो असेलही, असे राजनाथ सिंह यांनी या वेळी ठणकावून सांगितले. काश्मीरमधील असंतोष विझविण्यासाठी हुरियतसह सर्वसंबंधितांशी चर्चा करावी, असे आवाहन सर्वपक्षीय शिष्टमंडळाने सरकारला केले होते. येत्या दोन महिन्यांत पेलेट गनऐवजी पावा शेल्सचा वापर करण्यात येईल, अशी माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. राजनाथ सिंह हे सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. या शिष्टमंडळात २० राजकीय पक्षातील २६ सदस्यांचा सहभाग आहे.